जेलभरो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज जमावबंदी
त.भा.प्रतिनिधी, बेळगाव
ऊस दर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी गुरुवारी जेलभरो आंदोलन जाहीर केले आहे. यासाठी हजारो शेतकरी बुधवारी रात्री भुतरामहट्टी येथे दाखल झाले आहेत. शेतकऱ्यांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी प्रशासनाने गुरुवारी जमावबंदीचा आदेश जारी केला आहे.
अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारीही असणारे पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी गुरुवारी रात्री या संबंधीचा आदेश जारी केला आहे. गुरुवार दि. 5 नोव्हेंबरच्या सकाळी 6 पासून 7 नोव्हेंबरच्या सकाळी 6 पर्यंत बेळगाव परिसरात हा जमावबंदीचा आदेश राहणार आहे. भारतीय न्यायसंहिता 2023 च्या कलम 163 अन्वये हा आदेश जारी करण्यात आला आहे.
संपूर्ण बेळगाव शहर व परिसरात 5 हून अधिक जणांनी गटागटाने फिरू नये, जमावबंदीच्या काळात लाठ्याकाठ्या, शस्त्रs बाळगू नये आदी सूचना करण्यात आल्या आहेत. मार्केट, माळमारुती, शहापूर, एपीएमसी व बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात जमावबंदीचा आदेश असणार आहे. बुधवारी ऊसदर जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित होणार, अशी अपेक्षा होती. मात्र शेतकरी संघटनेने जेलभरो आंदोलन कायम ठेवल्यामुळे प्रशासनाने जमावबंदीचा आदेश जारी केला आहे.