मणिपूरमध्ये अनेक स्थानी संचारबंदी लागू
वृत्तसंस्था / इंफाळ
मणिपूरमध्ये सोमवारी सुरक्षा सैनिकांनी किमान 11 संशयित दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर राज्याच्या काही भागांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. संभाव्य हिंसाचार टाळण्यासाठी जिरीबाम आणि अन्य भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सध्या राज्यात शांतता असली तरी तणाव कायम असल्याने प्रशासनाने दक्षतेचा उपाय म्हणून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या आणखी काही तुकड्या सज्ज ठेवल्या आहेत. प्रभावित भागांमध्ये गस्त घातली जात आहे.
कुकी समुदायाचे संख्याबाहुल्य असणाऱ्या डोंगराळ भागात मंगळवारी पहाटे पाच वाजल्यापासून बंद पाळण्यात येत आहे. हा समुदाय सुरक्षा सैनिकांनी केलेल्या कारवाईचा निषेध करीत आहे. केंद्रीय दलांनी कुकी समुदायावर अन्याय केल्याची त्याची भावना आहे. तथापि, ही कठोर कारवाई आवश्यकच होती, असे ठाम प्रतिपादन राज्य प्रशासनाने आणि केंद्रीय सैनिकी दलांनी मंगळवारी केले.
आणखी हिंसाचार
संशयित दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर कुकीबहुल भागांमध्ये काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. इंफाळ खोऱ्यात राहणारे मैतेयी लोक आणि डोंगराळ भागात राहणारे कुकी-झू लोक यांच्या गटांमध्ये संघर्ष होत आहे. काही स्थानी या संघर्षाने सशस्त्र स्वरुप धारण केले आहे. परस्परांच्या घरांना आणि दुकानांना आगी लावण्याचे प्रकार मंगळवारी घडले. त्यामुळे प्रशासनाने दक्षतेचा उपाय म्हणून संचारबंदी लागू केली असून ती पुढील आदेशापर्यंत राहणार आहे. सोमवारी संध्याकाळपासून काही डोंगराळ प्रदेशात आणि इंफाळ पूर्व आणि इंफाळ पश्चिम या जिल्ह्यांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. प्रशासनाने दंगलग्रस्त भागांमध्ये अधिक सुरक्षा व्यवस्था ठेवली असून हिंसाचार आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सातत्याने चालला आहे, अशी माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली.