For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी मुख्यमंत्र्यांना काहीच म्हटलेले नाही’

12:52 PM May 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी मुख्यमंत्र्यांना काहीच म्हटलेले नाही’
Advertisement

‘उटा’चा पत्रकार परिषदेत दावा

Advertisement

मडगाव : प्रेरणा दिन कार्यक्रमात क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी केलेल्या भाषणात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना काहीच म्हटलेले नाही. मात्र, त्यांच्या विधानाचा विपर्यास केल्याचा दावा ‘उटा’ने मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. आदिवासी भवन मार्गी लागत नाही आणि आदिवासी समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्याने मंत्री गोविंद गावडे यांनी नाराजी व्यक्त केली होती. प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी याला जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द काढले नव्हते, आम्ही त्याला साक्षीदार असल्याचे ‘उटा’चे अध्यक्ष प्रकाश वेळीप यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे आदिवासी कल्याण खात्याचा ताबा आहे. तसेच ‘उटा’ संघटनेच्या बैठका त्यांच्या सोबत झालेल्या आहेत. या बैठकीत ते प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामांसाठीचे आदेश देतात. मात्र, ती कामे मार्गी लागत नाहीत. त्याबद्दल मंत्री गोविंद गावडे यांनी जाहीररित्या नाराजी व्यक्त केली होती. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांचा अपमान किंवा त्यांना दोषी धरणे असा होत नाही. ही केवळ प्रशासकीय दिगंगाईबाबतची टिप्पणी होती, असे प्रकाश वेळीप म्हणाले.

Advertisement

मंत्री गावडेना बाजू मांडण्याची संधी द्यावी

दरम्यान, मंत्री गोविंद गावडे हे गोव्याबाहेर असून ते गोव्यात आल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांची भेट घेणार आहेत. त्यावेळी त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी द्यावी, तडकाफडकी कोणताही निर्णय घेऊ नये, असेही प्रकाश वेळीप म्हणाले.

‘उटा’चा गोविंदला पूर्ण पाठिंबा

या संपूर्ण प्रकरणात जर मंत्री गोविंद गावडे यांच्यावर कारवाई झाली तर संपूर्ण गोव्यातील आदिवासी बांधव तसेच ‘उटा’ संघटना गोविंद गावडे यांच्यासोबत राहणार असल्याचा दावा विश्वास गावडे यांनी केला. उटाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन प्रेरणा दिन कार्यक्रमात मंत्री गोविंद गावडे यांनी केलेल्या विधानावर चर्चा केली असून त्यातून मुख्यमंत्र्यांचे समाधान झाल्याचा दावाही प्रकाश वेळीप यांनी केला. तसेच प्रेरणा दिन कार्यक्रमाचा व्हिडीओ प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांना पाठवल्याचे सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेला उटाचे उपाध्यक्ष विश्वास गावडे, विशेष चिटणीस दुर्गादास गावडे, उमेश गावकर व उटाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.