Cultural Kolhapur : सोमेश्वर मंदिर, गायकवाड वाडा, आखरी रस्ता; संस्कृती जपणारी शुक्रवार पेठ
शहराचे उत्तरेकडचे टोक म्हणजे शुक्रवार पेठ. ती थेट पंचगंगा नदीच्या घाटाजवळ जाऊन थांबली आहे
By : सुधाकर काशीद
कोल्हापूर : पेठेजवळूनच पंचगंगा नदी वाहते. या पेठेतच शंकराचार्यांचा मठ आहे. कोल्हापूर संस्कृतीचा ठेवा असलेला लक्ष्मीसेन जैन मठ तसेच रहाटगाडगे नावाची विहिर आणि करवीर शंकराचार्य पीठही याच पेठेत आहे. याशिवाय मस्कुती तलाव, कोल्हापूरची धर्मशाळा, पंचगंगा हॉस्पिटल, पोलीस क्लब, जामदार क्लब, भोपेराव यांचा वाडा, पंचगंगा तालीम, डॉक्टर गुणे वाडा, सोमेश्वर मंदिर, गायकवाड वाडा, सहस्रबुद्धे वाडा हे सारे जुन्या कोल्हापूरचे वैभव शुक्रवार पेठेतच आहे आणि शुक्रवार पेठ हा पंचगंगा स्मशानभूमीकडे जाणारा शेवटचा रस्ता म्हणून या रस्त्याला आखरी रस्ता असेही टोपण नाव आहे. अशा विविधतेची शुक्रवार पेठ कोल्हापूरच्या संस्कृतीचा एक नक्कीच अविभाज्य असे अंग आहे.
पंचगंगा नदीला पूर आला की त्याचे पाणी पहिल्यांदा शुक्रवार पेठेत येऊन पसरते. 1912 मध्ये या पेठेतील मिरजे यांच्या घरापर्यंत पुराचे पाणी आले, हा पूर खूप मोठा होता. त्या महापुराची नोंद म्हणून मिरजेंच्या दारात एका दगडावर ‘महापूर 1912’ असं कोरले गेले. त्यानंतर पूरपातळीचा अंदाज घेण्यासाठी या दगडाचाच आधार घेऊ लागला. त्यानंतर 77 वर्षांनी म्हणजे 1989 मध्ये पुराचे पाणी मिरजे यांच्या घराच्या पुढे गेले आणि धर्मशाळेजवळच्या म्हणजे सध्याच्या पंचगंगा हॉस्पिटलच्या मारुती मंदिराजवळ जाऊन थांबले. तेथे पुरपातळीची दुसरी नोंद 1989 मध्ये कोरली गेली.
शहराचे उत्तरेकडचे टोक म्हणजे शुक्रवार पेठ. ती थेट पंचगंगा नदीच्या घाटाजवळ जाऊन थांबली आहे. शुक्रवार तेली गल्ली आणि गंगावेशीतून येणाऱ्या रस्त्याच्या तिकटीपासून खाली शुक्रवार पेठेची हद्द सुरू होते. रस्त्याच्या सुरुवातीलाच आता पोलीस चौकी आहे. पण तेथे पूर्वी पोलीस क्लब होता. शुक्रवार पेठेची धर्मशाळा ही ओळख अगदी अलीकडे पुसली गेली. धर्मशाळेऐवजी पंचगंगा हॉस्पिटल अशी नवी ओळख झाली आहे. या ठिकाणी बैठ्या छपराची धर्मशाळा होती. पिंपळाच्या पारावर महादेव आणि मारुतीचे देऊळ होते. वाहतुकीची साधने मुबलक नसतानाच्या काळात पर्यटक व भाविकांना या धर्मशाळेचा मोठा आधार होता. या धर्मशाळेत फक्त दह्याचा बाजार भरत होता. धर्मशाळेत पाण्याचा मोठा हौद आणि सार्वजनिक स्वच्छतागृह होते.
धर्मशाळेला लागून पूर्वेकडे वळलेल्या रस्त्यावर लक्ष्मीसेन जैन मठ आहे. जुन्या राजवाड्याच्या कमानीची आठवण व्हावी, असा या मठाचा नगारखाना आहे. या मठात जैन धर्माचा इतिहास, साहित्य, पुरातन धर्मग्रंथ व विविध रूपातील छोट्या मोठ्या मूर्तींचे जतन झाले आहे. मठाच्या आवारात अखंड पाषाणातील मानस्तंभ आणि तीर्थंकरांची नऊ मीटर उंच मूर्ती आहे. हा मठ जैन धर्माचे पूजा अभ्यास केंद्र असला तरीही एका धर्मापुरता हा मठ राहिलेला नाही. हा मठ शुक्रवार पेठेचा एक अविभाज्य घटक बनून गेला आहे. जैन मठाबरोबरच करवीर पीठाच्या शंकराचार्यांचा मठ हे या परिसराचे धार्मिक वैभव आहे.
‘अभिनव पंचगंगा तीर वास कमला निकेतन करवीर सिंहासनाधीश्वर विद्याशंकर भारती’ अशीच या पीठाच्या शंकराचार्यांची मोठी बिरुदावली आहे. शुक्रवार पेठेच्या उत्तरेच्या टोकाला मठातून निघालेली छोटी पायवाट थेट पंचगंगा घाटावर जाऊन थांबते. मठाचे सागवानी लाकडातील चौसोपी बांधकाम आता पाडले गेले आहे. पण तेराव्या शतकात हा मठ बांधला गेला आहे. पूर्वी संकेश्वर मठाशी संलग्न हा मठ होता. आता त्याचे स्वतंत्र अस्तित्व आहे. कोल्हापूरच्या धार्मिक परंपरेची साक्ष म्हणून मठ ओळखला जातो. जवळच भोपेराव सरकारांचा वाडा होता. आता अपार्टमेंट आहे. तेथे तुळजाभवानीचे मंदिर आहे. भोपेराव हे तुळजापूरच्या मंदिराचे मानकरी आहेत.
त्यासमोर टोपकरांचा व रस्त्यालगत सहस्त्रबुद्धेचा वाडा होता. पुराचे पाणी हमखास या वाड्यापर्यंत यायचे. ज्ञानेश्वर प्रिंटिंग प्रेसचे श्री. सहस्त्रबुद्धे यांचा हा वाडा. या वाड्याच्या ठिकाणी ज्ञानेश्वर अपार्टमेंट उभारली. नदीच्या जवळ उभारलेली ही कोल्हापुरातली पहिली अपार्टमेंट. अपार्टमेंटमध्ये संगीतकार विजय डावजेकरांचा सहवास होता. फ्लॅटच्या गच्चीवर छोटी बाग आणि संगीताच्या मैफिलीसाठी छोटे व्यासपीठ आहे.
पंचगंगा तालीम, हे या पेठेचे खास वैशिष्ट्य. 1924 साली या पेठेची स्थापना झाली. या परिसरातील गोडबोले यांचा तालीम उभारणीत मोठा वाटा. शिवाजी पुलाचे बांधकाम ज्यांच्या देखरेखीखाली केले गेले, ते हे गोडबोले, अशी त्यांची जुन्या पिढीला ओळख आहे. डॉक्टर गुणे वाडा अजूनही आहे तसा आहे. आयुर्वेदाचार्य मानल्या जात असलेल्या डॉक्टर गुणे यांची स्मृती त्यांच्या हातगुणामुळे आणि वाड्याच्या रूपाने अजूनही लोकांच्या स्मरणात आहे. फडणीस, अष्टेकर, बावडेकर, पाचलग, दिवाण, धनवडे यांचेही वाडे या परिसरात होते.
गणपती आणि पंजे विसर्जनाच्या मिरवणुकीचा अंतिम टप्पा म्हणजे पंचगंगा तालमीच्या गॅलरीत एक वादकाची प्रतिकृती होती. यांत्रिक करामतीने तो वादक नगारा वाजवायचा. मिरवणूक संपेपर्यंत हे वादन सुरू राहायचे. काटकर या तंत्रज्ञाचे हे कसब होते. किंबहुना हे नगारा वादन विसर्जन मिरवणुकीचे खास वैशिष्ट्या होते. तालमीजवळच ज्येष्ठ संपादक पुढारीकार ग. गो. जाधव यांचे घर, बालकथाकार रा. वा .शेवडे गुरुजी यांचे निवासस्थान आणि कोल्हापुरातून चार वेळा विधानसभेवर निवडून गेलेले शेतकरी कामगार पक्षाचे त्र्यंबक सिताराम कारखानीस यांचेही घर याच पेठेत होते.