Cultural Kolhapur : नंदी मंदिरात अन् शिवलिंग गाभाऱ्याबाहेर, अनोखे शिवमंदिर तुम्ही पाहिलंय?
कोल्हापूरच्या समाज जीवनाचे जे अंतरंग समजावून घ्यायचे झाले तर मंदिर पाहणे गरजेचे आहे
कोल्हापूर : नंदीचे दर्शन घेतल्याशिवाय महादेवाचे दर्शन पूर्ण होत नाही असे म्हणतात. त्यामुळे पहिल्यांदा नंदी आणि त्यापुढे शिवलिंग अशीच सर्व मंदिराची रचना असते. पण कोल्हापुरात मात्र एक अपवाद आहे. नंदी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आणि गाभाऱ्याबाहेर शिवलिंग आहे. त्यामुळे मंदिरात नंदीला महत्त्वाचा मान आहे. बसवनंदी अशी त्याची ओळख आहे. या वेगळ्या मंदिराला अनेक अख्यायिकांची जोड आहे . अर्थात अख्यायिका ह्या आख्यायिकाच असतात. हा नंदी रोज एक गहूभर पुढे जातो आणि एक तीळभर मागे येतो, ही आख्यायिका तर फार प्रसिद्ध आहे. या अख्यायिकेभोवतीच हा नंदी गुरफटलेला आहे.
कोल्हापूरचे जे वेगवेगळे अंतरंग आहे त्यात या नंदीच्या मंदिराचा समावेश आहे. हा नंदी समोर शंभर फुटावर असलेल्या रंकाळ्यापर्यंत जाऊन पोहोचला की जगबुडी ही अख्यायिका सांगूनच मंदिराची माहिती पूर्ण होते. कोल्हापूरच्या समाज जीवनाचे जे अंतरंग समजावून घ्यायचे झाले तर मंदिर पाहणे गरजेचे आहे. ज्या काळात रंकाळा तलाव परिसरात वस्ती नव्हती त्या वेळचे हे मंदिर आहे आणि जुन्या कोल्हापूरची ओळख सांगताना स्थानवैशिष्ट्या आहे आणि या परिसरातील रहिवाशांनी ते आस्थेने जपले आहे.
ताराबाई रोडवरून रंकाळा तलावाकडे जाताना रंकाळ्याजवळच डाव्या हाताला हे मंदिर आहे. ज्यावेळी रंकाळा परिसरात अगदी तुरळक वस्ती होती. त्यावेळी हे मंदिर अगदी थेट रंकाळा तलावा समोरच होते पण आता मंदिरा सभोवती बांधकामे झाली व मंदिर त्याच्या आड दडले गेले. प्रत्येक महादेव मंदिरात पुढे नंदी असतो. त्याला पहिल्यांदा नमस्कार व नंतर शिवलिंगाला नमस्कार. पण इथे मात्र पहिल्यांदा शिवलिंग व नंतर नंदीला नमस्कार आहे. मंदिराचा सुंदर गाभारा आहे. त्यात हा बसलेला सुंदर दगडी नंदी आहे. कोल्हापुरात जेवढ्या पाणवठ्याच्या जागा तेवढी शिवलिंग.
जेवढी झाडे तेवढे देव अशा अर्थाचा करवीर महात्म्यात एक श्लोक आहे आणि वस्तुस्थितीही तशीच आहे. कोल्हापुरातील प्रत्येक तळ्याच्या काठावर किंवा पाणवठ्याच्या जागी त्या काळातील लोकांनी शिवलिंगे स्थापित केली आहे. अर्थात त्या निमित्ताने तरी पाणवठ्याची जपणूक व्हावी, हा त्या मागचा उद्देश आहे. नैसर्गिक जलसाठा अशा अर्थानेच या ठिकाणांकडे पाहणे गरजेचे आहे. कपिलतीर्थ जवळ तळे होते तेथे कपिलेश्वर महादेव मंदिर आहे. कोटी तीर्थावर, वरूण तीर्थावर महादेव मंदिर आहे.
रावणेश्वर तलाव म्हणजे आताचे शाहू स्टेडियम. तेथे रावणेश्वर तलाव होता तो मुजवून तेथे शाहू स्टेडियम तयार केले गेले. आणि आता रावणेश्वर मंदिर स्टेडियमच्या एका बाजूला उभे आहे. गंगावेशीतील कुंभार तळे जेथे होते तेथे ऋण मुत्तेश्वर मंदिर आहे. लक्षतीर्थावरही महादेव मंदिर आहे. जयंती नाला पूर्वी जयंती नदी होता. त्याच्या उगमालाही कात्यायनीचे मंदिर आहे. जिर्णोद्धार या मंदिराचा जिर्णोद्वार 1967 साली झाला. उपाध्यक्ष वसंतराव लक्ष्मण निगडे यांनी त्यात पुढाकार घेतला. त्यावेळी नगराध्यक्ष सखाराम बापू खराडे होते. आणि नगरपालिका बांधकाम समिती सभापती नामदेव ढवण होते.
Cultural Kolhapur 10 एप्रिल 1967 साली हा जीर्णोद्वार झाला. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याजवळ खराळा तळे होते तेथे फलगुलेश्वर मंदिर आहे. जयप्रभा स्टुडिओ जवळच्या पद्माळा तळ्याजवळही महादेवाचे मंदिर आहे. टाऊन हॉ लमधील महादेवाच्या मंदिराच्या मागे मोठी विहीर आहे. यातला धार्मिक भाग क्षणभर बाजूला ठेवला तरी कोल्हापुरातील पाणवठ्याच्या जागी महादेव मंदिरे भाविकांनी बांधली आहेत. हे जलसाठे त्यामुळे जपले जावेत ही त्यामागची भावना आहे. असेच हे रंकाळाजवळचे नंदी मंदिर आहे आणि ते लोकांनी जपले आहे.