For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Cultural Kolhapur : ऐतिहासिक मंदिरे, दगडी तटबंदीचा भव्य पिरसर म्हणजे 'संस्थान शिवसागर!'

12:45 PM Apr 25, 2025 IST | Snehal Patil
cultural kolhapur   ऐतिहासिक मंदिरे  दगडी तटबंदीचा भव्य पिरसर म्हणजे  संस्थान शिवसागर
Advertisement

कोल्हापूरच्या जडणघडणमध्ये या स्थानाला आजही अनन्य साधारण महत्त्व आहे

Advertisement

By : सौरभ मुजुमदार

कोल्हापूर : पंचगंगा नदी घाट म्हणजे जणू काही कोल्हापूरचे वैभवच. आज आपण क्षणभर विसावा आणि मन शांतीसाठी या ठिकाणी जातो, जेथे खरोखरच एक वेगळे सुख अनुभवता येते. अत्यंत प्राचीन इतिहासाची नोंद असणाऱ्या याच पंचगंगेच्या घाटावर करवीर संस्थानच्या छत्रपती आप्तेष्टांची, सरदार, मानकरी यांची समाधी, मंदिरे असणारा, दगडी तटबंदीच्या आतील भव्य दिव्य परिसर म्हणजेच ज्याला संस्थान शिवसागर म्हणून ओळखले जाते.

Advertisement

कोल्हापूरच्या जडणघडणमध्ये या स्थानाला आजही अनन्य साधारण महत्त्व आहे. लाखो करवीरवासीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या येथील प्रत्येक मंदिराची व परिसराची महती इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्णच आहे. उंचच्या उंच दीपमाळा, आकर्षक कोरीव पाषाणातील मंदिरे, त्या समोरील सदर, कमानी, ओवऱ्या अशा वास्तुवैभवांमध्येच एक इतिहास दडलेला आहे. कोल्हापूरचे शाही वैभव असणारा संस्थानचा विजयादशमीचा सीमोल्लंघन सोहळा पार पडल्यावर करवीर निवासीनीची सुवर्ण पालखी सिद्धार्थ नगर, तोरस्कर चौक मार्गे आजही याच संस्थान शिवसागर मध्ये क्षणभर विसावा घेण्यास प्रत्येक मंदिरासमोरील सदरेवर थांबते.

करवीर पिठाचे शंकराचार्य स्वामींच्या समाधीसमोर, त्यानंतर पहिले छत्रपती संभाजी महाराज करवीरकर उर्फ शंभू छत्रपती व नंतर छत्रपती शिवाजी महाराज दुसरे (खानवटकर घराणे) यांच्या समाधी मंदिरासमोरील सदरेवर थांबते व आरती स्वीकारून देवीची पालखी पुन्हा मंदिराकडे प्रस्थान करते. देवीचा रखवालदार श्री रंकभैरव देवाची पालखीदेखील याचवेळी या ठिकाणी येते. कैक वर्षांची ही परंपरा आजही सुरुच आहे. या संस्थान शिवसागरची संपूर्ण व्यवस्था करवीर संस्थानच्या देवस्थान धर्मादायच्या हुजूर खाजगी खात्याकडून (सध्या छत्रपती चॅरिटेबल ट्रस्ट) आजही अविरतपणे चालू आहे.

येथील प्रत्येक मंदिराचा छबीना स्वतंत्रपणे निघत असे (पालखी सोहळा) या छबिना सोबत श्राद्धविधीदेखील विधिवत संपन्न होत असे, याची संपूर्ण व्यवस्था मुजुमदार यांच्याकडे असावयाची. 9 डिसेंबर 1920 च्या गोपाळ बळवंत मुजुमदार यांना छत्रपतींनी दिलेल्या आज्ञापत्रावरून सदरची माहिती उजेडात येते. येथील प्रत्येक मंदिर हे वास्तुशास्त्राचा अद्भुत नमुना असून दरवर्षी येणाऱ्या पंचगंगा नदीच्या महापुराखाली येऊन देखील अभेद्यपणे ताठ मानेने उभे आहे. परिसराभोवताली दगडी फरस बंदी असून रॉकेलच्या दिव्यावरच हा परिसर उजळायचा,

याची साक्ष देणारा एकमेव खांब येथे आजही आहे. मागे वाटसरूंसाठी दगडी ओवऱ्या होत्या. आत प्रवेश करण्यासाठी पूर्वाभिमुख उंच दगडी कमान असून तिच्या डाव्या बाजूच्या पाशाणावर ऐतिहासिक शिलालेख देखील आहे. श्रद्धास्थाने पंचगंगेच्या काठावरची’ या मालिकेतून आपण येथील प्रत्येक मंदिराची ऐतिहासिक माहिती उजेडात आणण्याचा प्रयत्न करीत आहोत. आपला इतिहास न विसरता त्यातून एक वेगळीच प्रेरणा, नवचैतन्य, स्फूर्ती, मिळत रहाते. हा अनुभव येथे भेट दिल्यावर नक्कीच येतो.

त्रिपुरारी पौर्णिमेच्या पहाटेला लाखो कोल्हापूरकरांच्या साक्षीने हा पंचगंगेचा भव्य घाट लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघतो. संस्थान काळात आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आतषबाजी व तोफांची सलामी दिली जात असे. वास्तुशास्त्राचा अद्भुत नमुना असणारा, लाखो करवीरवासियांचे श्रद्धास्थान आणि पर्यटकांचे आकर्षण असणारा पंचगंगेच्या काठावरील संस्थान शिवसागर परिसराचे दुर्मिळ छायाचित्र.

Advertisement
Tags :

.