Cultural Kolhapur: "कोल्हापुरी संगीत चिवडा", 133 वर्षे जुनी परंपरा असलेल्या चिवड्याचे महत्व काय?
"कोल्हापुरी संगीत चिवडा" अशी ही एक वेगळीच ओळख कोल्हापूरची आहे
By : सुधाकर काशीद
कोल्हापूर : कोल्हापूर म्हणजे ग्रामीण शहरी मिलाफाचे एक गाव. कोल्हापूर म्हणजे शाहू महाराज, अंबाबाई. कोल्हापूर म्हणजे कुस्ती, चप्पल, पांढरा तांबडा रस्सा, मराठी चित्रपटांचे माहेरघर अशीही वेगवेगळ्या अंगाने असलेली ओळख. त्याचबरोबर ‘कोल्हापुरी संगीत चिवडा“ अशी ही एक वेगळीच ओळख कोल्हापूरची आहे. आणि गेली 133 वर्ष ती जपली गेली आहे.
1892 पासून मिळतोय संगीत चिवडा
कोल्हापुरी संगीत चिवडा या नावाने हा चिवडा ओळखला जातो. तिखट, कुरकुरीत किंवा झणझणीत अशी विशेषणे चिवड्याला जरूर शोभतात. पण कोल्हापुरात संगीत चिवडा या नावाने हा चिवडा 1892 सालापासून मिळत आहे. महाद्वार रोडवर चिपडे यांची चाळ आहे.
तेथे गोविंद विनायक मराठे यांनी चिवडा व मिठाईचे दुकान सुरू केले. या दुकानाची ओळख संगीत चिवडा, अशी झाली असली तरी सुरुवातीला ‘गोविंद विनायक मराठे सेपरेट कंपनी उर्फ ब्राह्मणाचे फराळाचे दुकान“ अशी त्याची लांबलचक ओळख होती.
उधारी बुडवणाऱ्याचे नाव फलकावर
त्यात सेपरेट हा शब्द अशासाठी होता की, कांदा लसूण वर्ज्य असणाऱ्यांना तसा चिवडा सेपरेट मिळत होता. दुकानाच्या दारात आणखी एक फलक कायम लटकत असायचा. त्यावर उधारी बुडवणाऱ्या ग्राहकाचे नाव खडूने ठळक लिहिले जायचे. आता तसे नाही. हे दुकान संगीत चिवडा म्हणून का ओळखले जाऊ लागले.
संगीत हे नाव चिवड्याशी का जोडले हे नेमकेपणाने मात्र आजही सांगता येत नाही. ग्राहकाच्या प्रशंसापत्राची प्रेम या दुकानात चिवडा, खव्याची बर्फी मिळते आणि त्याचबरोबर संताप शमण या नावाने कॉफी असायची. याशिवाय कंबरघट्ट या विशेषणाने डिंकाचे लाडू मिळायचे. या दुकानात आत्ताही फारशी सजावट नाही.
एका ग्राहकाचे पत्र मात्र छान फ्रेम करून दुकानात अगदी समोरच लावले आहे. अँगलो केमिकल इंडियन एजन्सीचे एक वरिष्ठ अधिकारी डी. एस. काळे यांनी या दुकानातून चिवडा घेतला होता. आणि तो चिवडा घेऊन ते लंडनला गेले होते.
तेथील दोन महिने त्यांच्या वास्तव्यात हा चिवडा कुरकुरीत कसा राहिला, हे त्यांनी लंडनहून पत्र पाठवून सांगितले होते. 10 सप्टेंबर 1900 या तारखेचे हे पत्र मराठी यांनी दुकानात ठळक लावले आहे .हे पत्र संगीत चिवड्याची प्रसिद्धी करण्यास उपयोगी पडत राहिले. आणि अजूनही ते प्रसिद्धी देण्याचे काम करत आहे.
कोल्हापूरच्या हॉटेल व्यवसायाची साक्ष
आता महाद्वार रोडवर महाद्वार चौकातून पापाच्या तिकटीकडे जाताना अगदी सुरुवातीलाच म्हणजे रेमंड्सच्या दुकानाला लागून चिपडे यांच्या चाळीत हे दुकान आहे. त्या काळात हॉटेलातील पदार्थ खाणे म्हणजे एक प्रकारे ती चैनच होती. आणि हॉटेलातले खाणेपिणे वर्ज्य मानणारेही बहुतेक जण होते, अशा काळात कोल्हापुरी संगीत चिवडा या नावाने कोल्हापूरात पहिले किंवा दुसरे हे हॉटेल आहे.
आता मराठे परिवारातील नीलम मराठे या हे दुकानाचा व्यवहार पाहतात त्यातला व्यावसायिक भाग क्षणभर बाजूला ठेवूया. कोल्हापुरी संगीत चिवडा या आगळ्यावेगळ्या नावाने सुरू झालेला हा चिवडा 133 वर्ष महाद्वार रोडवर आहे. आणि कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाच्या इतिहासाची ती साक्ष आहे.
पहिले हॉटेल कोणते?
कोल्हापुरात महाद्वार रोडवरील गाडवे यांच्या इमारतीजवळ याच काळात एक हॉटेल सुरू झाले होते. तसेच महाद्वार रोडवरच दातार बिल्डिंगमध्येही कारापूरकर यांनी हॉटेल सुरू केले होते. आता देशपांडे वॉच मेकर जेथे आहे त्या जागेत कारापूरकर यांचे हॉटेल होते. पण पहिले हॉटेल कोणाचे हे मात्र नक्की सांगितले जाऊ शकत नाही.