For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Cultural Kolhapur: राजगुरु श्री सिद्धेश्वरबुवा महाराज मंदिर, पंचगंगा घाटावरील मंदिर पाहिलंत?

02:30 PM Jun 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
cultural kolhapur  राजगुरु श्री सिद्धेश्वरबुवा महाराज मंदिर  पंचगंगा घाटावरील मंदिर पाहिलंत
Advertisement

या मंदिरासमोर दगडी फरसबंदी व त्यापुढे नदीकाठावर पाषाण सदर आहे.

Advertisement

By : सौरभ मुजुमदार

कोल्हापूर : पंचगंगा नदी घाटावरील संस्थान शिवसागरची दगडी तटबंदी संपल्यानंतर पश्चिमेकडील नदीकडेच्या दिशेला तोंड करून उभे असणारे मंदिर म्हणजेच करवीर संस्थानचे राजगुरू ‘श्री सिद्धेश्वरबुवा महाराज’ या दिव्य पुरुषाचे समाधीस्थान. या मंदिरासमोर दगडी फरसबंदी व त्यापुढे नदीकाठावर पाषाण सदरदेखील आहे.

Advertisement

शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय सुपुत्र राजाराम महाराज व करवीर संस्थान संस्थापिका महाराणी ताराराणीसाहेब यांचे नातू, करवीरचे छत्रपती शिवाजी महाराज (दुसरे) यांची देवादिकांवर, साधुसंतांवर अपार श्रद्धा होती. त्यांचे अध्यात्मिक गुरु श्री सिद्धेश्वरबुवा महाराज. महाराजांनी काशीमध्येच विद्याभ्यास पूर्ण केला.

तीर्थयात्रा करीत कराडजवळ श्री क्षेत्र नृसिंहपूर येथे वास्तव्य केले. या महान सिद्ध पुरुषाची ख्याती छत्रपती शिवाजी महाराज (दुसरे) यांना समजताच ते त्यांच्या दर्शनासाठी पोहोचले. त्यांनी या सिद्ध पुरुषाला करवीर निवासिनीच्या दर्शनासाठी सन्मानपूर्वक आणले.

आपल्या निवासस्थानाजवळ त्यांची व्यवस्था करून अनुग्रह घेतला. छत्रपतींनी त्यांना अनेक गावे इनाम दिली. करवीर गादीवर आलेली संकटे श्री सिद्धेश्वरबुवांच्या आशीर्वादानेच दूर झाली, या श्रद्धेपोटी त्यांना गुरुस्थानी मानले. आपल्या नित्यकर्माची सुरुवात छत्रपती सदैव श्री सिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनानेच करीत असत.

1723, वैशाख वद्य षष्ठीला बुवा परलोकवासी झाले. त्यावेळी पंचगंगेच्या नदीकाठी त्यांचे समाधी मंदिर बांधले व पादुका स्थापन केल्या. त्याची नित्य पूजा अर्चा, पालखी सोहळा व रथोत्सव आदीसाठी स्वतंत्र व्यवस्थाही केल्या

छत्रपती घराणे व पंडित (महाराज) घराण्याचे अतूट नाते :

करवीर संस्थानच्या घडामोडीत श्री सिद्धेश्वरबुवा महाराज यांचे वंशज अर्थात पंडित (महाराज) घराणे यांचेही अमूल्य योगदान आहे. केवळ विद्याभ्यास, धर्मशास्त्र यामध्ये न अडकता करवीर संस्थानच्या गादीच्या संरक्षणार्थ बाबा महाराज, नाना महाराज व भाऊ महाराज प्राणाचीही पर्वा न करिता हातात शस्त्र घेऊन युद्धभूमीवर उतरले होते. त्यामुळे या घराण्याचे संस्थानच्या मोलाचे स्थान आहे.

छत्रपती शिवाजी महाराज (दुसरे) यांच्या पादुका गुरु महाराज वाड्यात आजही उत्सवावेळी आणून श्री सिद्धेश्वरबुवा यांच्या पादुका सोबतच पूजा केली जाते. राजर्षी छत्रपती शाहू महाराज व रघुपती पंडित यांच्या स्नेहाची कीर्ती तर सर्वज्ञातच आहे. याही रघुपती पंडित महाराजांचे समाधी मंदिर श्री सिद्धेश्वरबुवा यांच्या मंदिरासमोरच डावीकडच्या बाजूला पूर्व दिशेला तोंड करून उभे आहे.

नवरात्रोत्सवात मानाचे स्थान :

करवीर निवासिनीच्या नवरात्रामध्ये आजही ललिता पंचमी, अष्टमीला देवीच्या जागरावेळी व विजयादशमीला सीमोल्लंघन सोहळ्यासाठी करवीर निवासिनीची पालखी आवार सोडून बाहेर पडते त्या त्यावेळी तिच्यामागे राजगुरू श्री सिद्धेश्वरबुवा यांची पालखी असते.

अष्टमीला देवी नगरप्रदक्षिणेसाठी बाहेर पडते त्यावेळी जुना राजवाड्यातून गुरु महाराज वाड्यातून आरती स्वीकारून पुढे जाते. श्री सिद्धेश्वरबुवा महाराज यांच्या पादुकांसमोर हजारो भक्त आजही नतमस्तक होण्यासाठी हजेरी लावीत असतात.

छत्रपती शिवाजी महाराज (दुसरे) यांचे एकमेव चित्र :

करवीर संस्थांनमध्ये छत्रपतींकडे हत्तींना सजविण्यासाठी मार्तंड नावाचा एक चित्रकार होता. त्याच्याकडूनच पंडित महाराज यांनी आपल्या निवासस्थानामध्ये एक भित्तीचित्र काढून घेतलेले होते. ज्यामध्ये मध्यभागी श्री सिद्धेश्वरबुवा असून त्यांच्या पुढे छत्रपती शिवाजी महाराज (दुसरे), पाठीमागील बाजूला श्री सिद्धेश्वरबुवा यांचे प्रथम सुपुत्र श्री रामचंद्र महाराज पंडित आहेत. अनेक अभ्यासकांच्या मते छत्रपती शिवाजी महाराज (दुसरे) यांचे हे एकमेव चित्र असावे. जुना राजवाड्या शेजारी गुरु महाराज वाड्यामध्ये आजही आपण हे भित्तीचित्र पाहू शकतो.

Advertisement
Tags :

.