Cultural Kolhapur: कलारत्ने कोल्हापूरची, कलामहर्षी बाबुराव पेंटर
कोल्हापूर म्हणजे अनेक दिग्गज कलाकारांच्या निर्मितीची जणू खाणच आहे
By : सौरभ मुजुमदार
कोल्हापूर : आपल्या कोल्हापूरला एक सुवर्ण इतिहास आहे. कोल्हापूर म्हणजे जणू काही कलाकारांची खाणच आहे. म्हणून कोल्हापूरला कलानगरी म्हणूनही ओळख आहे. इथल्या भूमीमध्ये अनेक दिग्गज कलाकार आपल्या स्मृती ठेवून गेले. त्यांच्या कर्तृत्वाच्या स्मृतींना उजाळा देण्याचा प्रयत्न आपण या लेखमालेतून करीत आहोत.
ज्यांच्याबद्दल कितीही लिहिले तरी आपले शब्द अपुरे पडतील. ‘कलारत्ने कोल्हापूरची’ या लेखमालेतून त्यांच्याविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. कोल्हापूर म्हणजे अनेक दिग्गज कलाकारांच्या निर्मितीची जणू खाणच आहे. ज्यामुळे या शहराला कलापूर म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
अशाच महान कलाकारांमध्ये आद्य व्यक्तिमत्व म्हणजेच कलामहर्षी बाबुराव पेंटर होय. ज्यांच्या नावाशिवाय कलेचा कोणताही वारसा हा सदैव अपूर्णच राहील. काही व्यक्तींना जन्मत:च कलेची मौल्यवान देणगी प्राप्त झालेली असते. त्याला या व्यक्ती स्वकर्तृत्वानेच हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतात, आकार देतात आणि त्याच्या तेजाने महान कलाकार म्हणून स्थापित करतात.
चित्रकार, शिल्पकार, तंत्रज्ञ, चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक असं हे हिऱ्याप्रमाणंच लखलखत्या तेजाचे व्यक्तीमत्त्व कलामहर्षी बाबुराव पेंटर. कोरीव मूर्तीकलेचे माहेरघर असणाऱ्या म्हैसूरच्या राजघराण्यांनी कोल्हापूरमधील कृष्णराव मेस्त्राRकडून हस्तशिल्पे प्रत्यक्ष घडवून घेतली. अशा आपल्या वडिलांचा जणूकाही कलेचा वारसा पुढे नेण्यासाठीच बाबुराव पेंटर यांचा जन्म 3 जून 1889 रोजी झाला.
बाबुराव पेंटर यांना त्यांचे आत्तेभाऊ आनंदराव मेस्त्राr यांचा लाभलेला सहवास मौल्यवान म्हणावा लागेल. नाट्यागृहात आनंदरावांनी बनविलेले ललितकला म्हणजेच चित्रांचे भव्यदिव्य असे मोठे पडदे तयार करण्यात बाबुराव पेंटर यांचा महत्त्वपूर्ण सहभाग असे. चित्रपटसृष्टीतील बाबुराव यांचा येथूनच पुढे प्रवास सुरू झाला.
लोकमान्यांनी दिली ‘सिनेमा केसरी’ची उपाधी
1 डिसेंबर 1917 रोजी आपल्या बंधूंच्या स्मरणार्थ बाबुराव यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना कोल्हापुरात खरी कॉर्नर येथे केली व 1919 मध्ये ‘सैरंध्री’ या कलात्मक मूकपटाची निर्मिती केली. उत्कृष्ट तंत्रज्ञ, भव्य दिव्य विशाल अशी पौराणिक काळातील राजवैभवाची मांडणी, आणि महत्त्वाचे म्हणजे सैरंध्रीची भूमिका करणारी स्त्राrच. या वैशिष्ट्यांवर आधारित हा चित्रपट स्वत: लोकमान्य टिळकांनी पाहिल्यावर त्यांनी बाबुराव यांना ‘सिनेमा केसरी’ ही उपाधी दिली.
चित्रपट निर्मितीसाठी त्यावेळी परदेशातून महागडे कॅमेरे आणले जात असत. परंतु, बाबुराव यांनी यातील तंत्राचे ज्ञान स्वअभ्यास करून आत्मसात केले व स्वत:च भारतातील पहिल्या स्वदेश निर्मितीच्या चित्रपट कॅमेऱ्याची निर्मिती तर केलीच शिवाय अशा देशी बनावटीच्या कॅमेऱ्याने तानाजी मालुसरे यांच्या शौर्यावर आधारित ‘सिंहगड’ या चित्रपटाची निर्मितीही केली.
या चित्रपटाला प्रेक्षकांनी इतकी गर्दी केली की ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त दिला. मात्र, चित्रपटाचे उत्पन्न पाहून सर्वप्रथम ब्रिटिशांनी तेव्हापासून चित्रपटावर कर आकारणी सुरू केली. विष्णुपंत दामले, फत्तेलाल, व्ही. शांताराम, भालजी पेंढारकर, चंद्रकांत मांडरे अशा चित्रपट सृष्टीतील शेकडो दिग्गजांची एका पिढीचीच निर्मिती बाबुराव यांनी केली.
बाबुराव पेंटर यांचा कला स्टुडिओदेखील ब्रिटिश कलाकारांप्रमाणे वैशिष्ट्यापूर्ण होता. ते स्वत: सुतार कामात निष्णात असल्यामुळे लाकडी फळ्यांचा कलात्मकतेने त्यांनी तेथे वापर केलेला होता. चित्रपट निर्मितीच्या कॅमेरासोबतच पुतळ्यांच्या ओत कामासाठी लागणाऱ्या वैशिष्ठ्यापूर्ण अशा भट्टीची निर्मितीही त्यांनी स्वत: केलेली होती.
या महान कलाकाराला रसिकांनीच ‘कलामहर्षी’ ही पदवी बहाल केली. एखादी वस्तू, यंत्र, अथवा साहित्य हे स्वत:हून निर्माण करण्याचे ज्ञान त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. प्रत्यक्ष चित्र कामासाठी लागणारी फ्रेम, ती ठेवण्यासाठी लागणारा घोडा, हे ते स्वत: तयार करीत असत.
चित्रकला,चित्रपटसृष्टी, शिल्पकला यासाठी कोणतेही विशेष प्रशिक्षण न घेता त्यांनी निर्माण केलेली ही कलासृष्टी पाहता, असा महान कलाकार कदाचित पुन्हा होणे नाही. स्वत:च्या चित्रपट प्रसिद्धीसाठी त्यांनी 1920 मध्ये मुंबईमध्ये तयार केलेली पोस्टर्स इतकी आकर्षक ठरली की, ती पाहून जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे तत्कालीन संचालक इंग्रज चित्रकार ग्लॅडस्टन सलोमन यांनी त्यांचा विशेष गौरव केला.
कोल्हापूरचे स्फूर्तीस्थान
कोल्हापुरातील शिवाजी थिएटरमधील बाबुराव पेंटर यांनी केलेली सजावट पाहण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्याचे उद्घाटन राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी केले होते. चित्रपटात स्त्राrची भूमिकाही स्त्रियांनीच करावी, हा सर्वप्रथम अट्टाहास बाबुराव पेंटर यांचाच होता. जो त्यांनी स्वत:धाडसाने आणि आत्मविश्वासाने प्रत्यक्षात आणला.
आपली ही भूमिका बाहेरगावी मांडताना त्यांनी सहज चित्रपट निर्मितीचा कॅमेरा पाहण्याची विनंती केली असता त्यांना अज्ञानी समजून दुर्लक्षित केले. नेमकी हिच गोष्ट त्यांना खटकली आणि यातूनच त्यांनी मोठ्या जिद्दीने, चिकाटीने, कष्टाने, स्वत: भारतातील पहिला चित्रपट निर्मितीचा कॅमेरा 4 वर्षांच्या अर्थक प्रयत्नाने तयार करून दाखविला.
त्यांच्या कलासृष्टीतील स्मृतीप्रित्यर्थ बनविलेले एक विशेष चित्रपट कॅमेरा शिल्प आजही खरी कॉर्नर येथे आहे. हजारो नागरिक आज येथून ये जा करतात. पण, ही मौल्यवान कला संपत्ती आज फारच अल्प जणांना ठाऊक असेल. खरोखरच या महान कलाकाराच्या या स्मृतीशिल्पासमोर आपणही नतमस्तक व्हावे असेच त्यांचे कार्य गौरवशाली आहे. कलापूरचा हा ध्रुव तारा कलासृष्टीत सदैव अढळस्थानी राहील हे मात्र नक्की!