For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाचव्या विजयासह चेन्नई अग्रस्थानावर

09:35 PM Apr 23, 2023 IST | Tarun Bharat Portal
पाचव्या विजयासह चेन्नई अग्रस्थानावर
Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 स्पर्धेतील रविवारी खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने यजमान कोलकाता नाईट रायडर्सचा 49 धावांनी पराभव करत आपल्या पाचव्या विजयासह गुणतक्त्यात आघाडीचे स्थान मिळवले.

धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडत 235 धावा झोडपल्या. यजमान कोलकाता नाईट रायडर्सना विजयासाठी चेन्नईने 236 धावांचे आव्हान दिले आहे. या सामन्यात चेन्नईकडून 18 षटकार आणि 14 चौकारांची आतषबाजी झाली. चालू आयपीएल स्पर्धेतील आतापर्यंतच्या सामन्यातील चेन्नईची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. चेन्नईतर्फे अजिंक्य रहाणे, देवान कॉनवे आणि शिवम दुबे यांनी अर्धशतके झळकवली. प्रत्युत्तरादाखल खेळताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने 20 षटकात 8 बाद 186 धावा जमवल्dया. कोलकाता संघातर्फे जेसन रॉय आणि रिंकू सिंग यांनी झळकवलेली अर्धशतके वाया गेली.

Advertisement

कोलकाता संघाच्या डावामध्ये सलामीचे दोन फलंदाज सुनील नरेन आणि जगदीशन हे केवळ संघाची पहिली धाव फलकावर लागली असताना तंबूत परतले. आकाश सिंगने सुनील नरेनचा खाते उघडण्यापूर्वी त्रिफळा उडविला तर तुषार देशपांडेने जगदीशनला एका धावेवर झेलबाद केले. वेंकटेश अय्यरने 20 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 20 तर कर्णधार नितीश राणाने 20 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारासह 27 धावा जमवल्या. कोलकाता संघाने पॉवरप्लेमध्ये 38 धावा जमवताना दोन गडी गमवले होते. कर्णधार राणा बाद झाल्याने जेसन रॉय आणि रिंकू सिंग यांनी पाचव्या गड्यासाठी 65 धावांची भागीदारी केली. रॉयने 26 चेंडूत 5 षटकार आणि 5 चौकारांसह 61 धावा जमवल्या. रसेल, विसे, उमेश यादव हे तीन फलंदाज लवकर बाद झाले. रिंकू सिंगने 33 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारासह नाबाद 53 धावा झळकवल्या. कोलकाताच्या डावामध्ये 12 षटकार आणि 14 चौकार नोंदवले गेले. त्यांना 10 धावा अवांतराच्या रुपात मिळाल्या. चेन्नईतर्फे तुषार देशपांडे आणि महेश तीक्ष्णा यांनी प्रत्येकी दोन तर आकाश सिंग, मोईन अली, रविंद्र जडेजा व पथिरना यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. या विजयामुळे चेन्नई संघाने सात सामन्यातून 5 विजयासह 10 गुण मिळवत राजस्थान रॉयल्सला खाली खेचले आहे.

या सामन्यात कोलकाता संघाने नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजी दिली. चेन्नईच्या फलंदाजांनी पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. ऋतुराज गायकवाड आणि कॉनवे यांनी 7.3 षटकात 73 धावांची भागीदारी केली. चेन्नईने पॉवरप्लेमध्ये 59 धावा झोडपल्या. या जोडीने संघाचे पहिले अर्धशतक 32 चेंडूत फलकावर लावले. आठव्या षटकात सुयश शर्माने गायकवाडचा त्रिफळा उडविला. त्याने 20 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह 35 धावा जमविल्या. गायकवाड बाद झाल्यानंतर कॉनवे आणि रहाणे यांनी चौकार आणि षटकारांवरच आपला भर दिला. कॉनवेने आपले अर्धशतक 34 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने झळकविले. 13 व्या षटकात वरुण चक्रवर्तीने कॉनवेला झेलबाद केले. त्याने 40 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह 56 धावा जमविल्या. रहाणेने शिवम दुबे समवेत तिसऱ्या गड्यासाठी 32 चेंडूत 85 धावांची भागीदारी केली. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी केवळ 16 धावात अर्धशतकी भागीदारी नोंदविली. चेन्नईच्या 150 धावा 85 चेंडूत फलकावर लागल्या. रहाणेने केवळ 24 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. खेजोरलियाने दुबेला झेलबाद केले. त्याने 21 चेंडूत 5 षटकार आणि 2 चौकारांसह 50 धावा जमविल्या. रवींद्र जडेजने 8 चेंडूत 2 षटकारांसह 18 धावा केल्या. रहाणेने 29 चेंडूत 5 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 71 तर धोनीने नाबाद 2 धावा जमविल्या. चेन्नईने या सामन्यात 11.75 धावांची सरासरी राखत 235 धावांची मजल मारली. कोलकाता संघातर्फे कुलवंत खेजोरलियाने 2 तर चक्रवर्ती आणि सुयश शर्मा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक : चेन्नई सुपर किंग्ज : 20 षटकात 4 बाद 235 (गायकवाड 35, कॉनवे 56, अजिंक्य रहाणे 71, शिवम दुबे 50, रवींद्र जडेजा 18, धोनी नाबाद 2, अवांतर 3, खेजोरलिया 2-44, चक्रवर्ती 1-49, सुयश शर्मा 1-29).

कोलकाता नाईट रायडर्स 20 षटकात 8 बाद 186 (रिंकू सिंग नाबाद 53, जेसन रॉय 61, नितीश राणा 27, वेंकटेश अय्यर 20, देशपांडे 2-43, तीक्ष्णा 2-32, आकाश सिंग, मोईन अली, जडेजा, पथिरना प्रत्येकी एक बळी).

Advertisement
Tags :

.