कच्च्या तेलाचा रशियातून पुरवठा घटला
भारत इतर देशांकडून आयात करतोय कच्चे तेल : प्रतिदिन 14 लाख बॅरलची आवक
नवी दिल्ली :
अमेरिकेकडून लादल्या गेलेल्या प्रतिबंधानंतर रशियाकडून कच्च्या तेलाचा पुरवठा कमी होत आहे. भारतालाही रशियाकडून कमी प्रमाणात कच्चे तेल पुरवले जात आहे. आता भारत कच्च्या तेलासाठी इतर देशांवर आपले लक्ष केंद्रीत करत आहे. भारत आता रशियाऐवजी इतर देशांकडून कच्च्या तेलाची आयात करत आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये आतापर्यंत रशियाकडून कच्च्या तेलाची आयात कमी करण्यात आली आहे. मध्यपूर्व आणि इतर तेल उत्पादक देशांकडून भारत कच्च्या तेलाची खरेदी करत आहे.
अमेरिकेचे निर्बंध
अमेरिकेने 10 जानेवारी रोजी रशियातील तेल उत्पादकांवर निर्बंध लादले आहेत. या योगे अमेरिकेने रशियाच्या उत्पन्नावरच आघात केला आहे. भारताने 23 फेब्रुवारीपर्यंत रशियाकडून प्रतिदिनी 14.5 लाख बॅरल कच्चे तेल आयात केले आहे. यापूर्वीच्या महिन्यात म्हणजेच जानेवारीत 16.7 लाख बॅरल प्रतिदिन इतकी कच्च्या तेलाची आयात रशियातून होत होती. म्हणजेच रशियातून कच्च्या तेलाची आयात 13 टक्के घसरली आहे.
इतर देश कोणते
दुसरीकडे इतर देशांचा विचार करता सऊदी अरबने 23 फेब्रुवारीपर्यंत भारताला 7 लाख 90 हजार बॅरल प्रतिदिन कच्च्या तेलाचा पुरवठा केला आहे. जानेवारी महिन्यात हेच प्रमाण 7 लाख 20 हजार बॅरल प्रतिदिन इतके होते. जानेवारीच्या तुलनेमध्ये पाहता सऊदी अरबमधून कच्च्या तेलाची आयात 10 टक्के वाढली आहे. 23 फेब्रुवारीपर्यंत अमेरिकेकडून भारताला 1 लाख 77 हजार बॅरल प्रतिदिन इतक्या कच्च्या तेलाचा पुरवठा करण्यात आला आहे. जानेवारीमध्ये पाहता हे प्रमाण 2 लाख 93 हजार बॅरल प्रतिदिन इतके होते. या व्यतिरिक्त भारताने कोलंबिया, ब्राझील आणि मेक्सीको यासारख्या देशांकडूनही कच्च्या तेलाची आयात केली आहे. या तिन्ही देशांकडून अनुक्रमे 196 टक्के, 92 टक्के आणि 28 टक्के कच्च्या तेलाची आयात वाढीव झाली आहे.
मेनंतर जानेवारीत विक्रमी आयात
सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार जानेवारीत भारताने 3.2 टक्के वाढीसह 20.85 दक्षलक्ष मेट्रीक टन कच्च्या तेलाची आयात केली आहे. मे 2024 नंतर पाहता ही आयात सर्वाधिक मानली जात आहे. भारत हा कच्च्या तेलाच्या आयातीच्या बाबतीमध्ये तिसऱ्या नंबरचा मोठा देश आहे. कच्च्या तेलाचा वापर 20.49 दक्षलक्ष मेट्रीक टनवर पोहोचला आहे. मागच्या वर्षाच्या जानेवारीच्या तुलनेमध्ये कच्च्या तेलाचा वापर 3.2 टक्के वाढला आहे. भारतातील दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने जानेवारीत रशियाकडून 10 टक्के वाढीसह 3 लाख 59 हजार बॅरल प्रतिदिन इतक्या कच्च्या तेलाची आयात केली आहे.