For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ratnagiri News : अणसुरे परिसरात क्रूड ऑईल तस्करी?

12:43 PM May 30, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
ratnagiri news   अणसुरे परिसरात क्रूड ऑईल तस्करी
Advertisement

राजापूर : दापोलीतील हर्णे धर्तीवर राजापूर तालुक्यातील माडबन-अणसुरे किनारपट्टी परिसरात क्रूड ऑईल तस्करी झाल्याची जोरदार चर्चा सुरू असून, या प्रकाराबाबत परिसरात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. या कथित प्रकारात काही स्थानिक राजकीय पदाधिकारी तसेच इतर संबंधितांनी आर्थिक लाभ घेतल्याचीही चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगली आहे. दरम्यान, ही तस्करी सुरू ठेवावी की थांबवावी यावरून ग्रामस्थांमध्ये मतभेद निर्माण झाल्याने सध्या हा प्रकार थांबविण्यात आल्याचे बोलले जात आहे. संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. 

Advertisement

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महिनाभरापूर्वी या परिसरातील अरबी समुद्रात खोल समुद्रात एक मोठे जहाज संशयास्पदरीत्या थांबले होते. त्यानंतर त्या जहाजातील क्रुड ऑइल छोट्या बोटींच्या माध्यमातून किनाऱ्याकडे आणण्यात येत असल्याची चर्चा सुरू झाली. किनाऱ्यावर आणलेले ऑइल नंतर अज्ञात ठिकाणी हलविण्यात येत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकारात काही स्थानिक पदाधिकारी सहभागी असल्याच्याही चर्चा रंगल्या आहेत. या प्रकरणाला घेऊन ग्रामस्थांमध्ये मतभेद निर्माण होऊन चौकशीची मागणी करण्यात आली आहे. 

मोठ्या जहाजातून ऑइल उतरविताना काही प्रमाणात तेल समुद्रात सांडल्याने समुद्राच्या पाण्यावर तेलकट थर दिसून आला होता. मासेमारीसाठी गेलेल्या काही मच्छिमारांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी संबंधितांकडे नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जाते. क्रुड ऑइल अवैधरित्या विक्रीसाठी आणले जात असल्याचा संशय व्यक्त होत असून,

Advertisement

यामागे मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे, काही अंतरावर भारतीय तटरक्षक दल तसेच सागरी सुरक्षा यंत्रणा कार्यरत असतानाही असा प्रकार घडल्याच्या चर्चेमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

काहींकडून सुरक्षा यंत्रणांतील व्यक्तींचेही हात या प्रकरणात गुंतले असावेत, असे आरोप होत आहेत. या चर्चेमुळे परिसरात दोन गट पडल्याचे सांगितले जात आहे. काही जणांनी आर्थिक फायद्यासाठी हा प्रकार सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला,

तर काही ग्रामस्थांनी याला ठाम विरोध दर्शवत भविष्यात असे प्रकार होऊ नयेत यासाठी पुढाकार घेतला. या विरोधामुळे सध्या हा प्रकार थांबविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. येथे विरोध वाढल्याचे पाहून पुन्हा हालचाली दापोलीच्या दिशेने वळल्याचे बोलले जात आहे. 

दरम्यान, हर्णे येथे क्रूड ऑ इल तस्करीप्रकरणी झालेल्या कारवाईनंतर संबंधितांनी आपला मोर्चा पुन्हा राजापूर किनारपट्टीकडे वळविल्याचीही चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी अणसुरे परिसरातील समुद्रात स्फोट झाल्याची अफवाही पसरली होती. मात्र, प्रत्यक्षात तसा कोणताही प्रकार घडला नसल्याचे नंतर स्पष्ट झाले. तस्करीकडे लक्ष वळू नये, दिशाभूल व्हावी यासाठीच ही अफवा मुद्दाम पसरविण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

Advertisement
Tags :

.