कच्चे तेल 70 डॉलरपर्यंत घसरण्याचा अंदाज
नवी दिल्ली :
अमेरिका आणि इराण यांच्यातील करारामुळे येत्या काळात कच्च्या तेलाचे दर अगदी 70 डॉलरपर्यंत खाली येऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तज्ञांच्या मते होर्मुझ मार्ग पूर्णपणे खुला होणे व चीनची कमकुवत मागणी पाहता कच्च्या तेलाच्या दरात वरीलप्रमाणे घट होण्याची शक्यता आहे.
अमेरिका व इराण यांच्या करार होण्याच्या बातमीनंतर शुक्रवारी सकाळीच कच्च्या तेलाच्या किमती 90 डॉलरच्या खाली आल्या होत्या. शुक्रवारी 4 टक्के घसरत 87 डॉलर प्रति बॅरलपर्यंतही खाली आले होते. दोन्ही देशात समझोता झाला व त्याप्रमाणे वाटचाल सुरु राहिली तर तणाव कमी होऊन त्याचा परिणाम कच्च्या तेलावर दिसेल.
आता साऱ्यांच्या नजरा होर्मुझ सामुद्रधुनीवर टीकून आहेत. ही सामुद्रधुनी जर का पूर्णपणे खुली झाली तर कच्च्या तेलाची किमत वर उल्लेखल्याप्रमाणे खाली येऊ शकतात, असे तज्ञ म्हणत आहेत. जुलैअखेरपर्यंत सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होऊ शकते. अशाने तेलाचा पुरवठा सुरळीत होऊ शकेल आणि मग त्याने तेलाच्या किमती खाली येतील.
फिचच्या मते मे ते जुलैपर्यंत कच्चे तेल 100 ते 110 डॉलर प्रति बॅरल राहू शकते तर यानंतर ऑगस्टनंतर 80 डॉलर ते 70 डॉलरपर्यंत घसरु शकते.