कच्च्या तेलाच्या घटल्या किंमती, रंग कंपन्या तेजीत
मुंबई :
कच्चे तेल म्हणजेच ब्रेंट क्रूडच्या किमती बुधवारी जवळपास 5 टक्के इतक्या घसरणीत राहिल्याने याचा फायदा रंग उत्पादक कंपन्यांसोबत तेल कंपन्यांनी उचलल्याचे पहायला मिळाले. कच्च्या तेलाच्या घटलेल्या किंमतीमुळे रंग उत्पादक कंपन्यांचे समभाग बुधवारी शेअर बाजारात निराशादायक वातावरण असतानाही आपली चमक दाखविण्यामध्ये यशस्वी ठरले होते. रंग उत्पादन क्षेत्रातील एशियन पेंटस्, बर्जर पेंटस् इंडिया, शालिमार पेंटस्, कन्साई न्युरोलॅक पेंटस्, इंडिगो पेंटस् आणि अॅक्झो नोबेल इंडिया यांचे समभाग शेअर बाजारात इंट्रा डे दरम्यान 1 ते 5 टक्के इतके वाढले होते.
सध्याला कच्च्या तेलाच्या किंमती या नीचांकी पातळीवर पोहोचल्या असून लिबियामधून कच्च्या तेलाचे उत्पादन आणि निर्यात थांबविण्यासंदर्भातील वाद सोडविण्याबाबतचे संकेत मिळताना दिसत आहेत. या वातावरणाचा परिणाम कच्च्या तेलावरती दिसून आला. मंगळवारीदेखील कच्च्या तेलाच्या किंमती 4.9 टक्के इतक्या घसरणीत राहिल्या होत्या. डिसेंबर नंतर पाहता कच्च्या तेलाच्या किंमतीनी पुन्हा नीचांकी स्तर गाठला आहे.
एशियन पेंटस्चे समभाग 3 टक्के वाढत 332 रुपयांवर पोहोचले होते. तर इंडिगो पेंटचे समभाग 5 टक्के वाढत 1524 रुपयावर पोहोचले होते.