रशियातून कच्च्या तेलाची आयात सुरूच
दरदिवशी होतेय 1.8 दशलक्ष बॅरलची आवक : अमेरिकेचे निर्बंध लागू
नवी दिल्ली :
अमेरिकेकडून रशियामध्ये दोन कंपन्यांवर निर्बंध लादल्यानंतर देखील भारताकडून कच्च्या तेलाची आयात नेहमीप्रमाणे सुरू असल्याचे पहायला मिळते आहे. सध्या पाहता दरदिवशी 1.8 दशलक्ष बॅरल इतक्या कच्च्या तेलाची आयात भारत रशियातून करतो आहे. एकंदर कच्च्या तेलाच्या आयातीचा विचार केला गेल्यास रशिया हा एकमेव देश आहे ज्यांच्याकडून भारत मोठ्या प्रमाणात तेल मागवित आहे. एकंदर आयातीमध्ये रशियातून होणारे आयातीचे प्रमाण हे 34 टक्के इतके असल्याचेही सांगितले जात आहे. अलिकडेच म्हणजे 15 ऑक्टोबर रोजी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी रशियातील कच्च्या तेलाच्या आयातीवर निर्बंध लादले होते. त्याचप्रमाणे भारत आता रशियाकडून कमी कच्च्या तेलाची आयात करत असल्याचे वक्तव्य ट्रम्प करत आहेत.
तथापि भारत मात्र कच्च्या तेलाची आयात रशियाकडून करतोच आहे. पुढील काळात भारत कशा प्रकारे रशियातून कच्च्या तेलाची आयात करतो, हे पाहावे लागणार आहे. याचदरम्यान भारतातील काही कंपन्यांनी पुढील कच्च्या तेलाची ऑर्डर थांबवली असल्याचे बोलले जात आहे. रिलायन्स ही कंपनी 2022 पासून सर्वाधिक प्रमाणात रशियातून तेल आयात करते आहे. 2025 च्या पहिल्या 9 महिन्यात भारताने रशियातून प्रति दिवशी 1.9 दशलक्ष बॅरेल कच्चे तेल मागवले आहे.