कच्च्या तेलाची आयात नियंत्रणात
उत्पादनात किंचीत वाढ, आर्थिक वर्ष 2024 मधील चित्र: 233 दशलक्ष मेट्रीक टनचा वापर
नवी दिल्ली :
भारताच्या कच्च्या तेलाच्या वापरामध्ये 4.6 टक्के इतकी वाढ झाली असल्याचे सांगितले जात आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये कच्च्या तेलाचा वरीलप्रमाणे वापर करण्यात आला आहे.
याचदरम्यान कच्च्या तेलाच्या उत्पादनामध्ये 0.6 टक्के इतकी वाढ झाली असून आयातसुद्धा नियंत्रणात असल्याचे सांगितले जात आहे. पेट्रोलियम प्लॅनिंग अँड अनालिसिस सेल यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारताने 233.3 दशलक्ष मेट्रिक टन कच्च्या तेलाचा एकंदर वापर केला आहे. मागच्या तुलनेमध्ये कच्च्या तेलाचे वापराचे प्रमाण 4.6 टक्के इतके वाढलेले आहे.
देशांतर्गत उत्पादन
देशांतर्गत पातळीवर कच्च्या तेलाच्या उत्पादनामध्ये नाममात्र वाढ नोंदवली गेली आहे. 29.4 दशलक्ष मेट्रिक टन इतक्या कच्च्या तेलाचे उत्पादन आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये देशांतर्गत पातळीवर घेण्यात आले आहे. याच दरम्यान भारताने सदरच्या आर्थिक वर्षामध्ये 232 दशलक्ष टन इतक्या कच्च्या तेलाची आयात केली होती. मागच्या आर्थिक वर्षामध्येसुद्धा जवळपास एवढ्याच कच्च्या तेलाची आयात केली होती.