For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी

01:19 PM Jun 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी
Advertisement

आजपासून शाळा गजबजणार; विश्रांतीनंतर विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

Advertisement

बेळगाव : राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना सोमवार दि. 1 जूनपासून प्रारंभ होत असल्याने विद्यार्थी व पालकांनी शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेकडे धाव घेतली आहे. बेळगाव शहरातील शालेय साहित्य खरेदीसाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी दिसून येत आहे. नवीन शैक्षणिक वर्षाची तयारी करण्यासाठी विद्यार्थी वह्या, पाठ्यापुस्तके, दप्तर, पेन, पेन्सिली, कंपास बॉक्स, पाण्याच्या बाटल्या, गणवेश तसेच इतर आवश्यक साहित्य खरेदी करत आहेत. अनेक पालक आपल्या पाल्यांसह दुकानांमध्ये भेट देऊन आवश्यक वस्तूंची खरेदी करताना दिसत आहेत.

त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेतील शैक्षणिक साहित्य विक्री होणाऱ्या दुकानांमध्ये शनिवारी पालकांची व विद्यार्थ्यांची मोठी गर्दी दिसून आली. दरम्यान शालेय गणवेश, वह्या आणि इतर साहित्याच्या किमतींमध्ये किंचित वाढ झाल्याची भावना काही पालकांनी व्यक्त केली. तरीही मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यास पालक प्राधान्य देत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी विद्यार्थी उत्सुक असून बेळगावातील बाजारपेठेत सध्या शालेय साहित्य खरेदीमुळे उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisement

शैक्षणिक साहित्याच्या किमतीत वाढ

यंदा कागद, छपाई आणि वाहतूक खर्चात वाढ झाल्याने अनेक शैक्षणिक साहित्याच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षासाठी पालकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. विशेषत: गणवेश, बूट आणि दप्तरांवर अधिक खर्च करावा लागत आहे.

पालकांतून नाराजी

ठराविक दुकानांतूनच गणवेश-पाठ्यापुस्तके खरेदी करा, असा सल्ला दिला जात आहे. काही शाळांकडून विद्यार्थ्यांना व पालकांना ठराविक दुकानांतूनच गणवेश खरेदी करण्यास सांगितले जात असल्याने पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. इतर दुकानांमध्ये तुलनेने कमी दरात दर्जेदार साहित्य उपलब्ध असतानाही पालकांना पर्याय दिला जात नसल्याची खंत पालकांनी व्यक्त केली. सरकारी शाळांतून पाठ्यापुस्तके आणि गणवेश कापड वितरण करण्यात येणार आहे. परंतु खासगी शाळांतील विद्यार्थ्यांच्या पालकांच्या खिशाला मात्र झळ बसत आहे.

Advertisement
Tags :

.