बाजारपेठेत मंगळवारीही खरेदीसाठी गर्दी
बेळगाव : दिवाळी उंबरठ्यावर असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. शहर-उपनगरातील बाजारपेठांमधून खरेदीसाठी गर्दी होत आहे. मंगळवारी साप्ताहिक सुटी असतानाही शहरातील बाजारपेठ सुरू होती. फटाके, आकाशकंदील, सजावटीच्या वस्तू, मिठाई आणि कपड्यांच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी दिसून आली. विक्रेत्यांनी ग्राहकांच्या सोयीसाठी दुकाने उघडी ठेवून दिवाळी खरेदीचा हंगाम कॅश केला. बाजारपेठेतील गर्दीमुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. पोलिसांना वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी परिश्रम घ्यावे लागले. दिवाळी सणाला अध्याप चार दिवस बाकी असले तरी खरेदीसाठी नागरिकांतून मोठा उत्साह दिसून येत आहे. पावसानेही उघडीप दिल्याने खरेदीला जोर आला आहे. पुढील चार दिवसही बाजारपेठातून अधिक गर्दी होणार आहे. दिवाळीमध्ये बालचमू किल्ले बनवित असतात. किल्ले बनविण्यासाठी लागणारे साहित्य, मावळे खरेदी करण्यासाठी मुले बाजारात दिसून येत आहेत. सामाजिक, शैक्षणिक गणतीच्या निमित्ताने सध्या शाळांना सुटी असल्याने विद्यार्थीवर्ग किल्ले बनविण्याच्या कामात व्यस्त झाल्याचे दिसून येत आहेत.