For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कपडे खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी

03:04 PM Apr 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
कपडे खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी
Advertisement

बेळगाव : आजकाल सर्वत्र लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू असून कपडे खरेदीसाठी नागरिकांची लगबग पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील नरगुंदकर भावे चौक परिसर रविवारी गजबजून गेला होता. साड्या, डेस मटेरियल, रेडिमेड कपडे यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. विशेषत: महिलांची साड्यांच्या दुकानांमध्ये मोठी वर्दळ होती. विविध प्रकारच्या साड्या, लग्न समारंभासाठीचे विशेष डिझाइन्स आणि सणासुदीच्या कपड्यांची खरेदी करण्यासाठी नागरिक दुकानांत दाखल होत होते. त्यामुळे अनेक दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्मयता निर्माण झाली होती.

Advertisement

रविवार सुटीचा दिवस असल्याने नागरिक सकाळपासूनच खरेदीसाठी बाहेर पडले होते. यामुळे दुकानांसमोर मोठी गर्दी दिसून येत होती. विशेष म्हणजे महिलांची गर्दी लक्षणीय दिसून येत होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन दुकान व्यवस्थापनाने खबरदारीचा उपाय म्हणून ग्राहकांना एकदम आत न सोडता रांगेत उभे करून किंवा क्रमाने प्रवेश देण्याची व्यवस्था केली होती. दुकानातील गर्दी कमी राहावी आणि खरेदीदारांना सुरक्षित व सोयीस्कर वातावरण मिळावे, यासाठी कर्मचारी सतत नियोजन करताना दिसून आले. रविवारी कपडे खरेदीला उधाण आल्याचे पाहावयास मिळाले.

रविवार असल्याने सुटीचा दिवस आणि त्यात लग्नसराईचा हंगाम यामुळे या परिसरात दिवसभर खरेदीदारांची वर्दळ कायम होती. रस्त्यावरही वाहनांची मोठी रहदारी निर्माण झाली होती. पार्किंगची समस्यादेखील काही प्रमाणात जाणवत होती. लग्नसराईमुळे कपड्यांच्या बाजारपेठेत चांगलीच उलाढाल होत असून व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र, वाढती गर्दी लक्षात घेता नागरिकांनी संयमाने खरेदी करावी आणि प्रशासनानेही वाहतूक व गर्दी नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी गरज व्यक्त होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.