अंगारकीनिमित्त गणेश मंदिरांतून दर्शनासाठी गर्दी
बेळगाव : शहर आणि परिसरातील गणेश मंदिरांतून मंगळवारी अंगारकीनिमित्त सकाळी अभिषेक, विशेष पूजा असे कार्यक्रम झाले. मंदिरांसमोर आकर्षक मंडप उभारून मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दिवसभरात अनेक भाविकांनी मंदिरांना भेटी देऊन दर्शन घेतले. राणी चन्नम्मा चौक, हिंडलगा रोड सिद्धिविनायक मंदिर, शहापूर येथील गणेश मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. भाविक रांगेत उभे राहून दर्शन घेत होते. मंगलमूर्ती मोरया, जय गणेश असा जयघोष व घंटेचा निनाद यामुळे मंदिर परिसर दुमदुमून जात होता.
सध्या उन्हाळ्याची सुटी असल्याने मुलेही पालकांसमवेत दर्शनासाठी आलेली दिसून आली. सायंकाळी शहराच्या काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने भाविकांची तारांबळ झाली. पाऊस ओसरल्यानंतर मंदिर आवारात पुन्हा भाविकांनी गर्दी केली. अंगारकीच्या निमित्ताने उपवासाचे जिन्नस, फळफळावळांची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. फळे, सुका मेवा, साबुदाणे, शेंगदाणे यांचे दर वधारल्याचे दिसून आले. मंदिरांमध्ये रात्री 10.19 नंतर चंद्रोदयाला महाआरती होऊन तीर्थप्रसाद वितरण झाले. काही घरांमध्ये सामुदायिक अथर्वशीर्ष पठण झाले. रात्री चंद्रोदयानंतर गणपती व चंद्राला मोदकांचा नैवेद्य द़ाखवून भोजन करून उपवास सोडण्यात आला.
आता 29 सप्टेंबरला अंगारकी
गुढीपाडव्याला (19 मार्च 2026) सुरू झालेल्या पराभवनाम या संवत्सरात पुन्हा एक अंगारकी योग आला आहे. भाद्रपद मासात 29 सप्टेंबरला अंगारकी आहे.