अंगारकी संकष्टीनिमित्त खानापुरातील गणेश मंदिरांत दर्शनासाठी गर्दी
गणेश मंदिरात विशेष पूजेचे आयोजन : अभिषेक, प्रसाद वाटप
खानापूर : खानापूर शहरातील गणेश मंदिरात अंगारकी संकष्टीनिमित्त मंगळवारी भाविकांची दर्शनासाठी एकच गर्दी झाली होती. राष्ट्रीय महामार्गावरील सार्वजनिक गणेश मंदिरात पहाटे गणपतीची विधीवत पूजा व अभिषेक करण्यात आला. यानंतर भाविकांकडून अभिषेक करण्यात आले. अभिषेकासाठी तसेच दर्शनासाठी एकच गर्दी झाली होती रात्री 10 वाजेपर्यंत भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती. रात्री 10 वाजून 19 मिनिटांनी चंद्रोदय झाल्यावर महाआरती करण्यात आली. यानंतर भाविकांना तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच केंचापूर गल्लीतील सिद्धिविनायक मंदिरातही पहाटे मुख्य पूजाविधी सोहळा झाला. या मंदिरातही रात्री उशिरापर्यंत गणरायाच्या दर्शनासाठी गर्दीचा ओघ सुऊच होता. या मंदिरातील गणेशमूर्ती उजव्या सोंडीची असल्याने या मंदिराला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. सदर मंदिरातही चंद्रोदय झाल्यावर महाआरती होऊन सर्वांना तीर्थप्रसाद वाटण्यात आला.
आमटे, चापगावात कार्यक्रम
याशिवाय तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या गणेश मंदिरातही अंगारकीनिमित्त दर्शनासाठी गर्दी झाली होती. चापगाव येथे असलेल्या गणेश मंदिरातही सकाळी पूजा, अर्चा करण्यात आली. याशिवाय आमटे येथील गणेश मंदिरातही अंगारकी संकष्टीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये नित्य पूजा, अर्चा याबरोबरच आरती करण्यात आली. नंदगड येथील खानापूर तालुका शेतकी उत्पादक सहकारी विक्री संघाच्या आवारातील गणेश मंदिरातही मंगळवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी गणेश दर्शनासाठी नंदगड तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बिडी येथील गणेश मंदिरातही परिसरातील भाविक वर्ग गणेश दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होता. कुप्पटगिरी येथील गणेश मंदिरातही अंगारकी संकष्टीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.