शेवटच्या श्रावण सोमवारनिमित्त मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी
कणबर्गी श्री सिद्धेश्वर मंदिरात श्रींचे दर्शन-महाप्रसादाचा हजारो भाविकांनी घेतला लाभ
वार्ताहर/सांबरा
श्रावणातील अखेरच्या सोमवारी तालुक्यातील शिवालये भाविकांच्या गर्दीने फुलून गेली होती. कणबर्गी येथील निसर्गसौंदर्याच्या कुशीत वसलेल्या व जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात तर श्रींच्या दर्शनासाठी व महाप्रसाद घेण्यासाठी हजारो भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. श्रावण या पवित्र महिन्यामध्ये देवदर्शन आवर्जून केले जाते. यंदा श्रावण महिन्यामध्ये पाच श्रावण सोमवार आले होते. कणबर्गी येथे अखेरच्या सोमवारनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
रविवारी बैलजोड्यांची भव्य मिरवणूक
रविवारी शिवाजी गल्ली येथे पंचांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर बैलगाड्यांच्या भव्य मिरवणुकीला प्रारंभ झाला. त्यानंतर कुंभार गल्ली, शांतीसागर गल्ली, महात्माजी गल्ली, धर्मवीर संभाजी चौक, शिवमुर्ती रोडमार्गे रात्री उशिरा सिद्धेश्वर डोंगराकडे बैलगाड्या पोहोचल्या. बैलगाड्यांमधून महाप्रसादासाठी लागणारे साहित्य व भाज्या गावातून गोळा करून मिरवणुकीने डोंगराकडे नेण्यात आले. सुमारे 15 ते 20 बैलजोड्यांचा मिरवणुकीत सहभाग होता.
रात्री बारानंतर अभिषेक-पूजन
रविवारी मध्यरात्रीनंतर मंदिरात अभिषेक व पूजनासाठी प्रारंभ झाला. यावेळी भाविकांनी अभिषेक घालण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
सकाळी दहा वाजता महाप्रसादाला प्रारंभ
अखेरच्या सोमवारनिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन लवकरच महाप्रसादाला प्रारंभ करण्यात आला. सकाळी दहा वाजता देवाला नैवेद्य दाखविल्यानंतर महाप्रसादाचे पूजन करून महाप्रसाद वाटपाला प्रारंभ करण्यात आला. महाप्रसाद वाटपाची श्री सिद्धेश्वर भक्त मंडळ व ग्रामस्थांनी जय्यत तयारी केली होती. तऊणांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण जबाबदारीने कार्य करत होते. सकाळपासून डोंगरावर भाविकांच्या गर्दीला प्रारंभ झाला. त्यामुळे श्री सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. महाप्रसादासाठीही मोठी गर्दी होती. एकंदरीत श्री सिद्धेश्वर मंदिर परिसर अक्षरश: गर्दीने फुलून गेला होता. सायंकाळी उशिरापर्यंत महाप्रसाद वाटपाचे काम सुरू होते. अंदाजे साठ हजारहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतल्याचे श्री सिद्धेश्वर भक्तमंडळाने सांगितले.