ख्रिसमस तयारीसाठी बाजारपेठेत गर्दी
कोल्हापूर :
बुधवारी 25 रोजी नाताळ आहे. ख्रिसमस अवघ्या काहीच तासांवर येऊन ठेपल्याने ख्रिस्ती बांधवांच्या घरोघरी उत्साहाचे वातावरण आहे. जिंगल बेलची धून वाजू लागली आहे. चर्चमध्ये तऊण मंडळी एकत्र येऊन कॅरॉल्स गीते गात आहेत. ख्रिस्ती बांधव नवनवीन कपड्यांसह ख्रिसमससाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात दाखल होत आहेत. पानलाईन, बाजारगेट, राजारामपुरी, लक्ष्मीपुरीतील दुकानांत ख्रिस्ती बांधवांची गर्दी दिसून येत आहे.
ख्रिसमसमध्ये मित्रमंडळी, नातेवाईकांना केक भेट देण्याची ख्रिस्ती बांधवांमध्ये परंपरा आहे. त्यासाठी अनेक दुकानदारांनी विविध फ्लेवरमध्ये बनवलेले केक लक्ष वेधून घेतील, अशा काचेच्या पेटीत ठेवले आहेत. पानलाईन, राजारामपुरी, बाजारगेट, नागाळा पार्क येथील दुकानांमध्ये ख्रिसमसचे प्रतिक असलेल्या ख्रिसमस-ट्रीचीही मांडणी केली आहे. ख्रिसमस-ट्रीजवळ घर सजावटीच्या घंटा, चांदण्या, सप्तरंगी फुलांमधील लटकणी, सांताक्लॉजचे कपडे व टोपी, येशूंच्या जन्मावर आधारीत पोस्टर्स, पुतळे, रेनडिअर, विविध रंगांमधील शो-पीस, चॉकलेटस्, एलईडी लाईटसह विविध वस्तूंची मांडणी केली आहे. हिमवृष्टी झाल्याचे फिल आणणारे ख्रिसमसही पहायला मिळत आहेत. ख्रिस्ती बांधव खरेदीचा आनंद लुटत येशू ख्रिस्त जन्मावरील देखाव्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची जमवाजमव करत आहेत.
बऱ्याच दुकानांमध्ये येशूंच्या जन्मावर आधारीत देखावेही विक्रीसाठी ठेवले आहे. आकर्षक अशा या देखाव्यांना पसंती मिळत आहे. आकारानुसार देखाव्यांच्या किंमती आहेत. सांताक्लॉजचा लाल ड्रेस 600 ऊपयांपासून ते 3 हजार 500 ऊपयांमध्ये उपलब्ध आहेत. सांताक्लॉजच्या कापडी टोपीच्या किंमतीही क्वॉलिटीनुसार आहेत. तीन दिवसात बहुतांश ख्रिस्ती बांधवांनी केलेल्या मोठ्या खरेदीमुळे बाजारपेठेत मोठी उलाढाल झाली आहे.