पुरवठा असूनही पेटोलपंपांवर झुंबड
वाहनांच्या टाक्यांसह गॅलन, बाटल्या भरण्यास गर्दी : बहुतेक पेट्रोलपंपांवर लांबचलांब रांगा : ग्राहकांत वाद-भांडणे
पणजी : ‘राज्यात पेट्रोल आणि गॅस सिलिंडरचा मुबलक साठा असून कुणीही घाबरून जाऊ नये, तसेच साठवणूक करण्यासाठी पंपावर गर्दी करू नये’, असे मुख्यमंत्र्यांकडून वारंवार सांगण्यात येत असले तरीही काल बुधवारी अचानक राजधानीसह राज्याच्या अनेक शहरांमध्ये सर्व पेट्रोलपंपावर वाहनांची अक्षरश: झुंबड पहायला मिळाली. ही गर्दी एवढी की अनेक ठिकाणी तब्बल किलोमीटर लांबीच्या रांगा लागल्या. त्यातून सायंकाळी पाच वाजेपर्यंत बहुतेक पेट्रोलपंपवरील साठा संपून ते बंद करण्यात आले. राज्यात व्यावसायिक तसेच घरगुती सिलिंडरच्या तुटवड्यामुळे आधीच लोकांमध्ये चिंता पसरलेली असताना आता पेट्रोलही संपेल या भीतीपोटी वाहनचालकांनी पंपवर गर्दी केली होती. काही जण मोठे कॅन, बाटल्या, आदी भांडीही भरून घेत होते. त्यामुळे पाठीमागे असलेले काहीजण या प्रकाराना विरोध करत होते व त्यातून त्यांच्यात वाद-भांडणेही झाल्याचे आमच्या ठिकठिकाच्या प्रतिनिधींकडून मिळालेल्या माहितीवरून समजले आहे.
पुरवठा होऊनही पेट्रोलपंपवर गर्दी
प्राप्त माहितीनुसार अनेक पेट्रोलपंपवर बुधवारी सकाळी टँकरद्वारे इंधन पुरवठा करण्यात येत होता. काही ठिकाणी सायंकाळीही इंधन पुरवठा करण्यात आला होता. तरीही ग्राहकांच्या मनातील पेट्रोल संपण्याची भीती कमी होत नव्हती. त्यातूनच जो तो केवळ टाक्या भरून घेण्याच्या घाई-गडबडीत दिसत होता. या गर्दीत स्थानिकांपेक्षा पर्यटकांच्या वाहनांची संख्या अधिक प्रमाणात दिसून येत होती. त्याही पुढे जाताना राज्याच्या सीमा भागात महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काही खाजगी वाहनांनी गोव्यात येऊन पेट्रोल भरून नेल्याचीही माहिती मिळाली आहे.
सिलिंडर काळाबाजारला उत
किनारी भागात घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडराचा तुटवडा दिसून आल्यामुळे अनेक रेस्टॉरंटमध्ये चुलींचा वापर सुरू केल्याचेही दिसून आले आहे. असे असले तरीही याच संधीचा फायदा घेत काळाबाजार करणाऱ्यांनी घरगुती सिलिंडर तब्बल तीन ते साडेतीन हजार ऊपये किंमतीने विकण्यास सुरूवात केली आहे. व्यावसायिक सिलिंडरसाठी पाच ते साडेपाच हजार ऊपये मोजावे लागत असल्याचीही खात्रीलायक माहिती मिळाली असून हा काळाबाजार रोखण्यासाठी सरकारने आणि संबंधित यंत्रणांनी कठोरतेने पावले उचलावी, अशी मागणी होऊ लागली आहे. असे एकुण चित्र पाहता सिलिंडर किंवा इंधनाची ही टंचाई कृत्रिमही असू शकते, असा संशयही वर्तविण्यात येऊ लागला आहे.
एलपीजी तुटवड्यावर पीएनजीचा पर्याय,जोडणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
आखाती युद्धामुळे निर्माण झालेल्या एलपीजी तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आता सरकारने पाईप नॅचरल गॅस (पीएनजी) पुरवठ्याचा पर्याय लोकांसाठी खुला केला आहे. अशा जोडण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्या संबंधी जारी करण्यात आलेल्या पत्रकातून सदर माहिती देण्यात आली आहे. सध्याची युद्धस्थिती लक्षात घेता लोकांनी एलपीजीऐवजी पीएनजी वापरण्याचा पर्याय स्वीकारावा असे म्हटले आहे. गेल आणि बीपीसीएल यांची उपकंपनी असलेल्या गोवा नॅचरल गॅस प्रा. लि. ने या संकटाच्या परिस्थितीतही तिसवाडी आणि फोंडा येथील आपल्या ग्राहकांना घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठी पीएनजी पुरवठा सुरू ठेवला आहे. त्यामुळे विद्यमान ग्राहक या सेवेवर समाधानी आहेत. पीएनजी वापरामुळे ग्राहकांना सुरक्षित, विश्वसनीय, किफायतशीर आणि अखंड पुरवठ्याची हमी मिळत आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी जोडणी मिळवण्याच्या दृष्टीने आवश्यक औपचारिकता पूर्ण करावी. अधिक माहितीसाठी 8484030866 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन नागरी पुरवठा खात्याकडून करण्यात आले आहे.
विनाकारण गर्दी करु नको, पुरेसा इंधनसाठा उपलब्ध : मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून जनतेला दिलासा
अमेरिका-इराण युद्धामुळे इंधन टंचाईच्या ज्या अफवा पसरलेल्या आहेत, त्याकडे दुर्लक्ष करून विनाकारण पेट्रोलपंप व गॅस सिलिंडर पुरवठा दुकानांकडे गर्दी करू नका. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाशी गोवा सरकारचे सातत्याने बोलणे सुरू आहे. गोव्याला पेट्रोल व एलपीजी सिलिंडरचा कोणताही तुटवडा नाही. आगामी आठ दिवस पुरेस इतका साठा उपलब्ध आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. पर्वरी मंत्रालयात मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्यात पेट्रोल व एलपीजी सिलिंडरच्या तुटवड्याच्या मुद्यावर मुख्यमंत्री सावंत यांनी जनतेला दिलासा देताना सांगितले की, सध्या गोव्यात पुढील आठ ते दहा दिवस पुरेल इतका पेट्रोलसाठा आहे. त्यानंतरही हा पुरवठा सुरळीतपणे राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण पेट्रोल पंपावर गर्दी करता कामा नये. घरगुती गॅस सिलिंडर बुकींगनंतर 25 दिवसांनी उपलब्ध होत आहे. तरीही काही अडचण येत असल्याने पुरवठादारांकडे बोलणी करून यामध्ये कोणताही खंड पडता कामा नये, यासाठी विशेष लक्ष घालणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. व्यावसायिक सिलिंडरचा सध्याचा 20 टक्के कोटा उद्यापासून (गुऊवारी) 40 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे काही हॉटेल व्यावसायिकांना होणारा त्रास तोही दूर करून त्यांनाही दिलासा दिला जाईल, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.