For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी

10:59 AM Nov 10, 2023 IST | Tarun Bharat Portal
दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी
Advertisement

दिवाळी पर्वाला प्रारंभ : आकाश कंदील, दिवे, रांगोळी खरेदीसाठी बाजारात झुंबड

Advertisement

बेळगाव : अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या दिवाळी सणाला प्रारंभ झाला आहे. गुरुवारी वसुबारस, शुक्रवारी धनत्रयोदशी आणि रविवारी लक्ष्मी पूजन, मंगळवारी पाडवा तर बुधवारी भाऊबीज होणार आहे. या पार्श्वभूमीवर बाजारात दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. विशेषत: दिवे, आकाश कंदील, पूजेचे साहित्य, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तु, वाहने, सोन्या-चांदीचे दागिने आदींना मागणी वाढली आहे. त्यामुळे बाजारपेठ गजबजू लागली आहे. दिव्यांचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळीसाठी विविध साहित्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे उलाढालही अधिक असते. गुरुवारी वसुबारसने दिवाळी पर्वाला प्रारंभ झाला. या सणाला गाय आणि वासरू यांची पूजा केली जाते. धनत्रयोदशी, रविवारी दिवाळीचा मुख्य दिवस आहे. मंगळवारी पाडवा तर बुधवारी भाऊबीज आहे. त्यामुळे सण उत्साहात साजरा करण्यासाठी आबालवृद्धांसह नागरिकांची बाजारात वर्दळ वाढू लागली आहे. किराणा दुकाने, इलेक्ट्रॉनिक, मिठाई, कापड दुकानांतही गर्दी होऊ लागली आहे. विशेषत: पूजेचे साहित्य, फुले आणि फळांना मागणी वाढत आहे. पांगुळ गल्ली, गणपत गल्ली, खडेबाजार, किर्लोस्कर रोड, काकतीवेस, मारुती गल्ली, नरगुंदकर भावे चौक, कडोलकर गल्ली, समादेवी गल्ली, रामदेव गल्ली आदी भागात दुकाने साहित्यांनी सजली आहेत. साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजल्या जाणाऱ्या पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नवीन खरेदीला पसंती दिली जाते. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक आणि दुचाकींच्या शोरुम तसेच सोन्या-चांदीच्या दुकानांमध्ये बुकींगसाठी गर्दी वाढत आहे. त्यामुळे दिवाळीपर्वात मोठ्या प्रमाणात उलाढाल होणार आहे.

गुरुवारी वसुबारस साजरी

Advertisement

बाजारात आकाश कंदील, दिवे, पणत्या, रांगोळी, झेंडूची फुले आणि इतर पूजेच्या साहित्याची विक्री होऊ लागली आहे. बुधवारी सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे खरेदीत व्यत्यय आला होता. मात्र, गुरुवारी पावसाने उघडीप दिल्याने खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. गुरुवारी वसुबारस साजरी झाल्याने पूजेच्या साहित्याबरोबर इतर साहित्याची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. दिवाळीचा मुख्य दिवस जसजसा जवळ येत आहे तसतशी बाजारात खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. गुरुवारी सकाळपासूनच खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ वाढली होती. पूजेच्या साहित्याबरोबर बाजारात विविध फळांची आवक वाढली आहे. सफरचंद, सीताफळ, पेरू, संत्री, मोसंबी, केळी आदींना पसंती मिळत होती. लक्ष्मी पूजन आणि पाडव्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी बाजारात गर्दी वाढणार आहे. ऊस, केळीची पाने, अंबोती आदी साहित्याची आवक होणार आहे, अशी माहिती किरकोळ विक्रेत्यांनी दिली.

 बालचमूंची बाजारात लुडबुड

यंदा सण, उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्यासाठी नागरिकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. दिवाळीतील किल्ल्यांच्या प्रतिकृती खरेदीसाठी बालचमूंची बाजारात लुडबुड सुरू आहे. शिवराय, गडकिल्ले, बुरूज, मावळे आदींच्या प्रतिकृती खरेदी केल्या जात आहेत. दिव्यांचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळीसाठी पणती आणि दिवे परंपरा आहे. त्यामुळे विविध आकारातील पणती आणि दिवे खरेदी केले जातात. काही नागरिकांकडून परंपरा जपत मातीचे दिवे आणि पणत्यांना पसंती दिली जात आहे.

Advertisement
Tags :

.