रोटरी अन्नोत्सवात खवय्यांची गर्दी
चोखंदळ बेळगावकरांचा खाद्यपदार्थांवर ताव
बेळगाव : रोटरी क्लबच्यावतीने सीपीएड कॉलेज मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या अन्नोत्सवमध्ये शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी चोखंदळ बेळगावकरांनी हजेरी लावून खाद्यपदार्थांवर ताव मारला. शाकाहारी जेवण विभागात 9 नंबर स्टॉलवरील मनालीचे स्पेशल हिमाचल श•t आणि मोमोज ग्राहकांना कमालीचे आवडले. मांसाहारी विभागात स्टॉल नं. 4 वरील लाहोर गेट दिल्ली येथील ‘निजाम’ या स्टॉलवर चिकन चांगेशी व तिलवाली तंदुरी रोटी हे ग्राहकांचे आकर्षण ठरले. याचबरोबर अम्युजमेंट पार्क व वेगवेगळ्या प्रकारची पादत्राणे आणि तयार कपड्यांच्या स्टॉललाही अनेकांनी भेटी दिल्या. ग्राहकांच्या सेवेसाठी पार्किंगची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. 14 जानेवारीपर्यंत रोज सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहणाऱ्या या अन्नोत्सवात बेळगावकरांनी भाग घेऊन आनंद लुटावा, असे आवाहन रोटरी क्लबच्यावतीने करण्यात आले आहे. सोमवार दि. 8 जानेवारी रोजी ‘बॉलीवूड हिट्स’ हा विशेष कार्यक्रम होणार आहे. अन्नोत्सव व यासारख्या इतर कार्यक्रमांतून मिळालेला निधी रोटरी क्लबच्यावतीने सामाजिक कार्यासाठी खर्च करण्यात येतो. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरीचे सभासद विशेष परिश्र्रम घेत आहेत.
रोटरी अन्नोत्सवात संगीताचा जल्लोष : हार्मनी म्युझिकल ट्रूपतर्फे गाण्यांचे सादरीकरण
रोटरी अन्नोत्सवमध्ये रविवारी सायंकाळी बेळगावच्या हार्मनी म्युझिकल ट्रूपतर्फे ‘हिट्स ऑफ अरिजित सिंग’ हा कार्यक्रम झाला. यावेळी गोवा येथील गायक आकाश मंगेशकर व सिमी फोंडेकर यांनी अरिजित सिंग यांची गाजलेली गाणी सादर केली. त्यांना की-बोर्डवर रुद्रेश व शिवराज, गिटारवर हरिश तर परक्युसनवर संतोष गुरव यांनी साथ केली. गायकांनी ‘आशिकी-2’ मधील ‘हम तेरे बिन अब रह नहीं सकते’, ‘केसरिया’, ‘थोडी जगह दे दो’ यासह अनेक गाणी सादर केली. सूत्रसंचालन विनायक बांदेकर यांनी केले.