अंतिम सामन्यासाठी शौकिनांची गर्दी
वृत्तसंस्था / दुबई
चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत रविवार दि. 9 रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी भारतीय शौकिनांनी तिकीटांसाठी आतापासूनच झुंबड केली आहे. या स्पर्धेतील सोमवारी झालेल्या उपांत्य सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन अंतिम फेरी गाठली. या सामन्याला भारतीय शौकिन मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
आता दुबईमध्ये बऱ्याच श्रीमंत भारतीय शौकिनांनी हॉटेल्समधील आपला मुक्काम अंतिम सामन्यासाठी वाढविला आहे. दुबईतील बरीच आलिशान महागडी हॉटेल्स शौकिनांनी आरक्षित केली आहेत. त्याच प्रमाणे विविध हवाई कंपन्यांशी संपर्क साधून विमानाची परतीची तिकीटे आरक्षित केली आहेत. या स्पर्धेतील अंतिम सामन्याचे तिकीट ऑनलाईनद्वारे मिळविण्यासाठी 139, 177 भारतीय क्रिकेट शौकिनांची संख्या उपलब्ध असल्याचे दुबईतील आघाडीचे क्रिकेट प्रशिक्षक गोपाल जसपेरा यांनी सांगितले. हा अंतिम सामना पाहण्यासाठी जगातील विविध ठिकाणांहून दुबईला जाण्यासाठी विविध कंपन्यांनी आपली विमाने सज्ज ठेवली आहेत.