देवसू शेंडोबा माऊलीच्या जत्रोत्सवाला भाविकांची गर्दी
हजारो भाविकांनी घेतले दर्शन
ओटवणे प्रतिनिधी
देवसू गावचे ग्रामदैवत श्री देवी शेंडोबा माऊलीचा वार्षिक जत्रोत्सवात शनिवारी हजारो भाविकांनी गर्दी केली. देवसूसह केसरी आणि दाणोली या तीन गावांचे देवस्थान असल्यामुळे या उत्सवात हजारो भाविक शेंडोबा माऊली चरणी नतमस्तक झालेत. भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी अशी महती असलेल्या आणि माहेरवाशिणीची पाठीराखी असलेल्या शेंडोबा माऊलीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी कायम होती.
यानिमित्त सकाळी मंदिरात पुजा, अभिषेक आदी धार्मिक कार्यक्रम झाले. सायंकाळी शेंडोबा माऊलीला भरजरी वस्त्रांसह सुवर्ण अलंकार आणि आकर्षक फुलानी सजविण्यात आले. त्यानंतर तीन गावच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवीची मानाची ओटी भरल्यानंतर गाऱ्हाणे घालण्यात आले. यावेळी देवीच्या कृपाआशीर्वादासह नवस बोलणे, फेडणे, केळी, नारळ ठेवणे आदी कार्यक्रमांसाठी भाविकांची गर्दी झाली होती. शेंडोबा माऊलीची ओटी भरण्यासाठी माहेरवाशिणीसह महिलांची रीघ लागली होती. या उत्सवातील शेंडोबा माऊलीच्या वैशिष्ट्यपूर्ण व आगळ्या वेगळ्या साज शृंगारातील तेजस्वी दर्शनाने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. तसेच उत्सवानिमित्त मंदिराचा परिसर भाविकांसह विविध प्रकारच्या दुकानांनी फुलून गेला होता. यानिमित शेंडोबा माऊली मंदिराचा सभामंडप आणि परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता. या महाउत्सवानिमित संपुर्ण देवसू गावात ऊत्साहाचे वातावरण होते. एरव्ही शांतता असलेला हा गाव शनिवारी सायंकाळनंतर भाविकांच्या उपस्थितीने गजबजून गेला होता. गावातील चाकरमान्यांसह पाहुणे व मित्र परिवाराच्या उपस्थितीने देवसूवासियांचा आनंद द्विगुणीत झाला.