kolhapur : कार्तिक पौर्णिमेला नृसिंहवाडीत भाविकांची गर्दी !
श्री दत्त मंदिरात दिवसभर दर्शनासाठी भाविकांची रांग
नृसिंहवाडी : त्रिपुरारी - पौर्णिमेनिमित्त येथील भाविकांनी दत्त मंदिरात बुधवारी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. पहाटेच्या काकड आरतीपासून ते रात्री शेजारतीपर्यंत दत्त मंदिर घाट भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. यानिमित्त येथील दत्त देव संस्थानमार्फत मंदिर घाटावर वेगवेगळ्या दर्शन रांगांची व्यवस्था केली होती. मंदिर दक्षिण, उत्तर घाटावर निवारा मंडप, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अन्य सुविधा दिल्या होत्या.
येथील दत्त मंदिरात पहाटे पाच वाजता काकड आरती, प्रातःकालीन पूजा, सकाळी पंचामृत अभिषेक, दुपारी १२.३० वाजता श्रींच्या मुख्य चरण कमलांची महापूजा, दुपारी ३ ते ४ पवमान पंचसूक्ताचे पठण, सायंकाळी साडेसातनंतर धूप दीप आरती आणि रात्री उशिरा श्रींचा पालखी सोहळा झाला. त्यानंतर शेजारती झाली. दत्त देवस्थानमार्फत महाप्रसादाचे आयोजन केले होते. याचा लाभ ५ हजारांवर भाविकांनी घेतला. बुधवार असून देखील पौर्णिमा असल्याने दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या
.
ग्रामपंचायती कार्तिक पौर्णिमा यात्रेचे नेटके नियोजन केले. मुख्य मंदिर मार्ग सर्व वाहनांसाठी बंद केल्यामुळे भाविक सुलभतेने या मार्गावर ये-जा करत होते. दरम्यान, एसटी बसेससह खासगी वाहनांची संख्या मोठी असल्याने व येथील वाहने पालखीची जागा अपुरी असल्याने पार्किंगचा पुरता गोंधळ उडाला. तो आटोक्यात आणण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी केला.
बहुमजली पार्किंग हाउसफुल्ल
ग्रामपंचायतीचे बहुमजली पार्किंग चारचाकी वाहनांच्या गर्दीन हाऊसफुल्ल झाले. सकाळी ११ नंतर मुख्य स्वागत कमानीतून चारचाकी वाहने गावात सोडण्यात बंद केल्याने स्वागत कमान ते शिरोळ मार्गावर आणि स्वागत कमान ते कुरुंदवाड मार्गावर कुरुंदवाड पुलापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वाहने अस्ताव्यस्तपणे पार्किंग केल्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत होती.