Kolhapur : कुरुंदवाड घाटावर कार्तिक स्वामी दर्शनासाठी भाविकांची गर्दी ; महिलांची संख्या लक्षणीय....
कुरुंदवाड घाटावर कार्तिक स्वामी दर्शनासाठी भाविकांचा उत्साह
कुरुंदवाड : येथील ऐतिहासिक कृष्णा पंचगंगा घाटावर सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या वंशजानी बांधलेल्या महादेव पंचायतन मंदिरातील कार्तिक स्वामी दर्शनासाठी आज कृतिका नक्षत्रावर झालेल्या कार्तिक पौर्णिमेनिमित्त भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. कुरुंदवाड घाटावर हेमाडपंती कार्तिक स्वामी मंदिर आहे. या कार्तिक स्वामीचे इतरवेळा स्त्रियांनी दर्शन घेऊ नये अशी आख्यायिका आहे. मात्र कार्तिक पौर्णिमा व कृतिका नक्षत्र असल्यास स्त्रियांनी दर्शन घेणे लाभदायक मानले जाते. तसा उल्लेख धर्म सिंधू ग्रंथात आढळतो.
दक्षिण भारतातील कृष्णावेणा आणि पंचगंगा अशा सप्त्त नद्यांचा प्रयाग संगम असणाऱ्या ऐतिहासिक कुरुंदवाड घाटावर पूर्वभिमुख एकमेव कार्तिक स्वामी मंदिर आहे. यामुळे कृतिका नक्षत्रावर दर्शन घेणे भाग्यचे मानले जाते. या पार्श्वभूमीवर आज येथील कार्तिक स्वामी मंदिरासमोर भव्य मंडप उभारण्यात आला होता. कार्तिक स्वामींचे सर्वांना दर्शन व्यवस्थित व्हावे यासाठी मूर्ती मंडपात विराजमान करण्यात आली होती. कृतिका नक्षत्रावर आज पहाटे प्रातःकालीन पूजा आरती तसेच दुपारी महापूजा मंत्र पुष्प नैवेद्य आरती तसेच भजन कीर्तन कार्यक्रम पार पडले.
पूजेनंतर भाविकांना गोडबुंदी,केळी प्रसाद वाटप करण्यात आले. दर्शनासाठी दर्शन रांग व्यवस्था करण्यात आली होती. येणारे भाविक श्री चरणी फुले रुद्राक्ष मोरपीस अर्पण करत होते. यावेळी मंदिर व्यवस्थापनाकडून भाविकांना मोरपीस व श्रीफळ प्रसाद भेट देण्यात आला. मंदिर परिसरात पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबत बोलताना मंदिराचे मुख्य पुजारी डॉ.जयंत व्यंकटेश हूद्दार म्हणाले की यंदा कार्तिक पौर्णिमा व गुरुवार दिनांक 6 नोव्हेंबर असा दोन दिवस कार्तिक स्वामी दर्शनाचा योग आहे. तरी भाविकांनी दर्शन प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.