For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तहसीलदार कार्यालयात रेशनकार्डसाठी नागरिकांची गर्दी

11:07 AM Jul 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
तहसीलदार कार्यालयात रेशनकार्डसाठी नागरिकांची गर्दी
Advertisement

गरजूंना कागदोपत्री पडताळणी करून वैद्याधिकाऱ्यांच्या शिफारसीवरून कार्ड वितरण

Advertisement

बेळगाव : रेशनकार्डसाठी अनेक जणांनी अर्ज केला आहे. मात्र वितरण प्रक्रिया स्थगित केली आहे. त्यामुळे नागरिकांचे रेशनकार्ड वितरणाकडे डोळे लागून राहिले आहेत. रेशनकार्ड वितरणाची प्रक्रिया सुरू झाल्याची अफवा पसरल्याने बुधवारी तहसीलदार कार्यालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.सरकारकडून रेशनकार्डावर अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. अन्नभाग्य, गृहलक्ष्मी योजनेसह आयुष्मान आरोग्य योजना तसेच विविध सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे रेशनकार्ड मिळविण्यासाठी सर्वांनीच चढाओढ चालविली आहे. राज्यामध्ये नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या आचारसंहितेमुळे सरकारकडून रेशन कार्डवितरणाला स्थगिती दिली होती. आचार संहिता पूर्ण झाली असली तरी रेशनकार्ड वितरणाला सरकारकडून अद्याप हिरवा कंदील दाखविला नाही.

त्यामुळे रेशनकार्ड वितरण अद्याप स्थगित आहे. असे असले तरी वैद्यकीय उपचारांसाठी गरजूंना कागदोपत्री पडताळणी करून वैद्याधिकाऱ्यांच्या शिफारसीवरून रेशन कार्ड वितरण केले जात आहे. मात्र, काही जणांकडून रेशनकार्ड वितरण करण्यात येत असल्याची अफवा पसरविली जात असल्याने बुधवारी नागरिकांनी तहसीलदार कार्यालयात गर्दी केली होती. सकाळी 10 ते 12 या वेळेत रेशनकार्ड वितरणासाठी सुविधा उपलब्ध असल्याची माहिती नागरिकांना मिळाली होती. त्यामुळे तहसीलदार कार्यालयासह सायबर सेंटरवर नागरिकांची गर्दी दिसून आली.तहसीलदार कार्यालयातील अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांना विचारले असता अद्याप सरकारकडून मंजुरी देण्यात आलेली नाही.त्यामुळे वितरण प्रक्रिया ठप्प असल्याचे सांगण्यात आले असे असले तरी नागरिकांकडून सदर विभागात वारंवार जाऊन चौकशी केली जात होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.