For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धामणी नदीकाठी चढणीचे मासे पकडण्यास खवय्यांची गर्दी

04:29 PM Jun 25, 2024 IST | Abhijeet Khandekar
धामणी नदीकाठी चढणीचे मासे पकडण्यास खवय्यांची गर्दी
Dhamani river
Advertisement

 म्हासुर्ली वार्ताहर

Advertisement

गेल्या आठवड्याभरात धामणी नदीच्या खोऱ्यात मृगाचा चांगला पाऊस झाल्याने उन्हाळभर कोरडी पडलेली नदी नवीन पाण्याने प्रवाहीत झाली आहे.परिणामी नदी-ओढ्यातील पाण्याची पातळी स्थिर असून मासे पाणी प्रवाहाच्या उलट्या दिशेने धाव घेत आहेत.असे चढणीचे मासे पकडण्यासाठी गेल्या दोन दिवसापासून धामणी नदी किनाऱ्यावर खवय्यांची गर्दी वाढू लागल्याचे चित्र आहे.

पावसाळा सुरु झाल्यानंतर मृगाच्या मुसळधार पावसाने नदीला नवीन पाणी प्रवाहित होते.अशा वाहत्या पाण्यातून मासे सुरक्षित भागाकडे धाव घेत असतात.साधारणपणे माशांचा चढणीचा प्रवास मृग नक्षत्रात असतो.याच काळात माशांचा प्रजननाचा हंगाम असतो. तर उतरणीचा प्रवास उत्तरा नक्षत्रात असतो. असा राहिलेला वर्षानुवर्ष माशांचा प्रवास प्रत्येक पिढीला माहित असल्याने दर्दी मासे खवय्यांची नदी, ओढ्यावर मासे पकडण्यासाठीची गर्दी ठरलेली असते.

Advertisement

आठवडाभर झालेल्या दमदार पावसाने धामणी नदीला चार दिवसा पूर्वीच नवीन पाणी प्रवाहीत झाले आहे.परिणामी मोठया प्रमाणात चढणीचे मासे मिळू लागल्याने नदीवरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यात व पाणवठ्यावर तसेच मोठ्या ओढ्याच्या ठिकाणी मासेमारीसाठी रात्री उशीरा पर्यत खवय्यांची एकच झुंबड उडाल्याचे दिसून येत आहे.

सध्या चढणीचे मासे खवय्यांकरीता पर्वणीच ठरत असून मासे पकडण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवत आहेत. तर अनेकांना मासे पकडण्याची व पाहण्याची मोठी हौस असते. त्यामुळे धामणी नदी काठावर ठिकठिकाणी अशा हौशा-नौशांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

मच्छरदाणीचा असा ही वापर..!
घरात झोपताना डासां पासून रक्षण करण्यासाठी मच्छरदाणीचा वापर केला जातो. मात्र त्याच मच्छरदाणीचा मासे पकडण्यासाठी सध्या जाळे म्हणून सर्रास पणे वापर मासे खावय्यांकडून केला जात आहे.

Advertisement
Tags :

.