पी.एन.पाटील यांना अभिवादन करण्यासाठी गर्दी
सडोली खालसा :
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष व कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष करवीरचे आमदार स्वर्गीय पी एन पाटील - सडोलीकर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त सडोली खालसा (ता . करवीर ) येथे आयोजित कार्यक्रमात भर पावसातही हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावत आपल्या लाडक्या नेत्याला अभिवादन केले .
आमदार पी एन पाटील - सडोलीकर यांचे 23 मे 2024 रोजी निधन झाले .त्यांची अचानक झालेली एक्झिट कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली होती . गेली वर्षभर कार्यकर्ते विविध राजकीय घडामोडी वेळी स्वर्गीय पी एन पाटील यांच्या स्मृतिना सोशल मीडियाच्या माध्यमातून उजाळा देत होते .गेल्या पंधरा दिवसापासून स्व.पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कार्यकर्त्यांनी करवीर विधानसभा मतदारसंघात विविध प्रकारचे शैक्षणिक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते .गावोगावी डिजिटल लावून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून पी एन पाटील यांचे विधिमंडळातील व निवडणुकांमधील सभांच्या भाषणाची व्हिडिओ शेअर करत सर्वत्र पी एन पाटीलमय वातावरण निर्माण केले होते .
शुक्रवार दिनांक 23 मे रोजी सडोली खालसा येथील क्रीडांगणावर स्वर्गीय पी एन पाटील यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त प्रतिमापूजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते .यावेळी जिह्याचे खासदार छत्रपती शाहू महाराज, वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार धीरज देशमुख, ऋतुराज पाटील, राजेश नरसिंग पाटील, गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील, अरुण डोंगळे, बाळासाहेब खाडे उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, ए.वाय. पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग कांबळे, भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, उपाध्यक्ष राजाराम कवडे, माजी अध्यक्ष सदाशिव चरापले, संजय पाटील,उदयसिंह पाटील कौलवकर, पी.डी. धुंदरे , भारत पाटील,भोगावती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिगंबर मेडशिंगे, उपाध्यक्ष मोहन पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे क्रांतिसिंह पवार-पाटील, अक्षय पवार-पाटील यांच्यासह भोगावती साखर कारखाना, भोगावती शिक्षण मंडळ, गोकुळ दूध संघाचे आजी-माजी संचालक, माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य , कार्यकर्ते यांच्यासह हजारो कार्यकर्ते ग्रामस्थ युवक महिला यांनी श्रद्धांजली वाहिली. श्रीपतराव दादा बँकेचे चेअरमन राजेश पाटील सडोलीकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, तेजस्विनी पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
- भर पावसात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
स्वर्गीय आमदार पी एन पाटील यांनी राजकारण व समाजकारण करताना कार्यकर्त्याला संधी दिली .कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक ते त्यांना मानाची पदे मिळवून दिलीत .आपल्याकडे येण्राया सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या अडचणीची दखल घेऊन त्यांच्या प्रश्नांची तात्काळ सोडवणूक केली . यामुळे कार्यकर्त्यांचा भक्कम संच असणारा एक वजनदार नेता म्हणून जिह्यात त्यांची ओळख होती . कार्यकर्त्यांची ही त्यांच्यावर आढळ श्रद्धा होती .आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी त्याची प्रचिती आली .भर पावसात हजारो कार्यकर्त्यांनी केलेली गर्दी लक्षवेधी होती व पी एन पाटील यांच्यावरील प्रेमाचे साक्ष देत होती.