सावंतवाडी बसस्थानकात एनसीएमसी कार्डसाठीची गर्दी ओसरली; प्रशासनाच्या नियोजनामुळे नोंदणी व कार्ड वितरण सुरळीत
सावंतवाडी प्रतिनिधी : एसटी महामंडळाने १ सप्टेंबरपासून प्रवाशांसाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य केल्याने सावंतवाडी बसस्थानकात कार्ड नोंदणीसाठी प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. मात्र, प्रशासनाने या गर्दीवर नियंत्रण मिळवल्याने आता एनसीएमसी कार्डची नोंदणी आणि वितरण प्रक्रिया सुरळीत सुरू झाली आहे.
एसटी महामंडळाच्या विविध प्रवासी सवलतींचा लाभ घेणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी कार्डची सक्ती सुरुवातीला १ ऑगस्टपासून करण्यात आली होती. त्यानंतर प्रवाशांना कार्ड काढण्यासाठी मुदतवाढ देत ही सक्ती १ सप्टेंबरपासून लागू करण्यात आली.
१ सप्टेंबरपासून ज्या प्रवाशांकडे एनसीएमसी कार्ड उपलब्ध नाही, त्यांच्याकडून सवलतीऐवजी पूर्ण तिकीट आकारण्यास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे कार्ड मिळविण्यासाठी तसेच नोंदणी करण्यासाठी सावंतवाडी बसस्थानकात पहिल्याच दिवशी प्रवाशांची मोठी गर्दी झाली.
गर्दीमुळे काही काळ नोंदणी आणि कार्ड वितरण प्रक्रियेवर ताण निर्माण झाला होता. मात्र, प्रशासनाने दुपारनंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळवत प्रवाशांचे नियोजन केले. त्यानंतर कार्ड नोंदणी आणि वितरणाची प्रक्रिया सुरळीत करण्यात आली.
एनसीएमसी कार्डची सक्ती लागू झाल्याने सवलतीचा लाभ घेणाऱ्या महिला व ज्येष्ठ नागरिकांनी कार्ड काढण्यासाठी बसस्थानकातील संबंधित केंद्रावर नोंदणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.