सीमापार दहशतवाद जगासाठी सर्वात मोठा धोका
एससीओच्या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांचे प्रतिपादन : दुटप्पी भूमिका अस्वीकारार्ह
वृत्तसंस्था/ बिश्केक
शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीत भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावर अत्यंत स्पष्ट आणि कठोर भूमिका मांडली आहे. शासनपुरस्कृत सीमापार दहशतवाद हा कुठल्याही देशाच्या सार्वभौमत्वावरील थेट हल्ला आहे आणि याकडे कुठल्याही स्थितीत दुर्लक्ष केले जाऊ शकत नसल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. एससीओची ही बैठक किर्गिस्तानच्या बिश्केक शहरात पार पडली आहे.
दहशतवादाप्रकरणी कुठल्याही प्रकारच्या दुटप्पी मापदंडांसाठी कुठलेच स्थान नसावे. दहशतवाद्यांना समर्थन, पाठबळ आणि सुरक्षित आश्रय देणाऱ्या देशांच्या विरोधात एससीओने कठोर पावले उचलावीत असे राजनाथ सिंह यांनी नमूद केले आहे. एससीओमध्ये चीन, पाकिस्तान, रशिया, कजाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझ्बेकिस्तान, इराण, बेलारुससोबत भारत सदस्य आहे. एससीओ जागतिक लोकसंख्येच्या एका मोठ्या हिस्स्याचे प्रतिनिधित्व करत असल्याने केवळ स्वत:च्या क्षेत्रात नव्हे तर पूर्ण जगात शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करणे आमची जबाबदारी असल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
दहशतवादाचे केंद्र आता सुरक्षित नाही
दहशतवादाचे अ•s आता दंडापासून वाचू शकत नाही असा संदेश भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दिला आहे. भारत दहशतवाद विरोधात ‘शून्य सहिष्णूते’च्या धोरणावर मजबुतीने ठाम आहे. मागील वर्षी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यासारख्या घटना पूर्ण मानवतेला हादरविणाऱ्या असतात आणि जागतिक समुदायाने एकजूट होत दहशतवाद विरोधात उभे राहण्याची गरज असल्याचे उद्गार राजनाथ सिंह यांनी काढले आहेत.
जागतिक व्यवस्थेवर चिंता
जग सध्या वाढत्या संघर्षाच्या काळातून जात असल्याने जागतिक सहमती कमकुवत होतेय. ‘डोळ्याच्या बदल्यात डोळा’चे धोरण पूर्ण जगाला अंधकाराकडे नेणारे आहे. प्रत्येक निर्णयाचा प्रभाव गरीब आणि गरजू लोकांवरही पडतो, याचमुळे शांतता आणि करुणेला प्राथमिकता दिली जावी असे राजनाथ सिंह म्हणाले.
दहशतवादाला धर्म नसतो
दहशतवादाचा कुठलाही धर्म किंवा राष्ट्रीयत्व नसते. कुठलीही तक्रार किंवा मतभेद हिंसा आणि निर्दोष लोकांच्या हत्येचा आधार ठरू शकत नाही. कट्टरता, उग्रवाद आणि फुटिरवादाला सामोरे जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. तसेच दहशतवाद्यांचे सुरक्षित अ•s नष्ट करणे आणि त्यांना राजकीय संरक्षण देण्याची वृत्ती रोखणे काळाची मागणी असल्याचे वक्तव्य राजनाथ यांनी केले आहे.