कोट्यावधींची रोख रक्कम झारखंड-ओडिशात जप्त
प्राप्तिकर विभागाच्या छाप्यात कारवाई
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
प्राप्तिकर विभागाने ओडिशा आणि झारखंडमधील बौध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड या मद्यविक्री कंपनीवर छापा टाकून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली आहे. तसेच झारखंडमधील एका व्यावसायिकावरही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त करण्यात आली असून त्यांची मोजणी करण्याचे काम सुरू आहे. 50 कोटींहून अधिक ऊपयांची रोकड जप्त करण्यात आली असून त्याची मोजणी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. आयटी सेलने ओडिशातील बोलंगीर, संबलपूर आणि झारखंडमधील रांची, लोहरदगा येथे कारवाई केली आहे. सायंकाळपर्यंत आयटीचे छापे अद्याप संपलेले नाहीत, असे सूत्रांचे म्हणणे आहे. प्राप्तिकर विभागाचे लोक घटनास्थळी उपस्थित होते. बौध डिस्टिलरीज व्यतिरिक्त व्यापारी रामचंद्र ऊंगटा यांच्या मालमत्तेवरही छापे टाकण्यात आले आहेत. सकाळपासून या व्यावसायिकावर रामगड, रांची आणि इतर परिसरात कारवाई सुरू होती. रामगड आणि रांची येथील घरे आणि आस्थापनांमध्ये अधिकारी संपत्तीची पाहणी व मोजदाद करत होते. त्यांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफचे जवानही तैनात करण्यात आले होते. कारखाना आणि निवासस्थानातील तपासादरम्यान कागदपत्रांचीही छाननी करण्यात आली आहे.