कोट्यावधी महिलांनी घेतला काँग्रेस सरकारच्या गॅरंटीचा लाभ
खानापुरात बसचे पूजन करून शक्ती योजनेचा आनंदोत्सव साजरा, अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती
वार्ताहर/नंदगड
कर्नाटक सरकारने विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेला गृहलक्ष्मी, गृहज्योती, शक्ती योजना अशा विविध पाच योजना सुरू केल्या. योजना सुरू करून दोन वर्षे झाली तरीही या योजना व्यवस्थितपणे सुरू आहेत. त्याचा लाभ जनतेला होत आहे. त्यामुळे राज्यातील जनता सुखी, समाधानी व आनंदी आहे. काँग्रेस पक्षाने निवडणुकीत दिलेले वचन आपल्या राज्यातील काँग्रेस सरकारने पाळले. त्यामुळेच काँग्रेस सरकारचे सर्वत्र अभिनंदन होत असल्याचा अभिप्राय खानापूर ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महांतेश राऊत यांनी व्यक्त केला. शक्ती योजनेअंतर्गत अनेक महिलांनी राज्यातील विविध देवस्थानांना भेट दिली आहे. शिवाय प्रत्येक महिलेला दोन हजार रुपये प्रति महिना देऊन त्यांना आर्थिक सबळ केले आहे. सरकारने पाच गॅरंटी योजना यशस्वीपणे राबवल्याबद्दल राज्यात सर्वत्र आनंदोत्सव व विजयोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या वतीने येथील बसस्थानक आवारात पंच गॅरंटी योजनेबाबत समाधान व्यक्त करण्यासाठी आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
प्रारंभी पंच गॅरंटी योजना कमिटीचे खानापूर तालुका अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांच्या हस्ते बसचे पूजन करण्यात आले. त्यानंतर खानापूर आगाराचे व्यवस्थापक बेनकोनकोप यांनी खानापूर बस आगाराच्या कामकाजाबद्दल माहिती दिली. शक्ती योजनेबद्दल बोलताना ते म्हणाले, खानापूर आगारांतर्गत 779830 महिलांनी शक्ती योजनेचा लाभ घेतला आहे. दररोज वीस हजार महिला बसने प्रवास करतात. रोज साडेपाच लाख रुपये बस प्रवासाचा खर्च होतो. त्याची सोय सरकारने करून दिली आहे. त्यामुळे तालुक्यातील महिला त्यांचा पुरेपूर लाभ उठवत आहेत. प्रकाश मादार म्हणाले, राज्यातील प्रत्येक माणूस उपाशी राहू नये म्हणून मुबलक रेशनचा पुरवठा सरकारतर्फे केला जात आहे. शिवाय मोफत बससेवेमुळे महिलांचा प्रवासही सुखकर झाला आहे. त्यामुळे जनता काँग्रेस सरकारच्या पाठीशी आहे. यावेळी ता. पं. कार्य.अधिकारी रमेश मेत्री, काँग्रेसच्या नेत्या सावित्री मादार, वैष्णवी पाटील, दीपा पाटील, काँग्रेसचे नेते लक्ष्मण मादार आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.