कृषी खात्याकडून पीक विमा परिपत्रकाचे अनावरण
बेळगाव : जिल्ह्यात रब्बी हंगामाची पेरणी सुरू आहे. शेतकरी पेरणीच्या कामात गुंतले असून पेरणी लवकरात लवकर आटोपण्यासाठी लगबग करीत आहेत. रब्बी हंगामातील पेरणी नैसर्गिक आपत्तीमुळे वाया जाऊ नये व शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागू नये, या उद्देशाने कृषी खात्याकडून पंतप्रधान पीक विमा भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या दृष्टीने गुरुवारी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या हस्ते पीक विमा परिपत्रकाचे अनावरण करण्यात आले.
खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांना दुबार पेरणीही करावी लागली. मात्र सदर पेरणीही अतिवृष्टीमुळे हाती लागली नाही. यामुळे शेतकऱ्यांवर दु:खाचा डोंगर कोसळून ते हवालदिल झाले होते. पण यातून सावरत शेतकरी शेतीची मशागत करून रब्बी हंगामाच्या पेरणीची कामे सुरू केली. जिल्ह्यात हजारो हेक्टर क्षेत्रात पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत. तर काही ठिकाणी अद्याप पेरण्या सुरू आहेत.
खरीप हंगामाप्रमाणे रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागू नये तसेच त्यांना आर्थिक संकटही सोसावे लागू नये या दृष्टीने जिल्हा कृषी खात्याकडून आतापासूनच उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तसेच शेतकऱ्यांना पीक विमा भरण्याचे आवाहन करत यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या हस्ते पीक विमा भरण्याचे परिपत्रक जारी केले असून शेतकऱ्यांना लवकरात लवकर विमा भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यावेळी कृषी खात्याचे सहसंचालक एच. डी. कोळेकर, उपसंचालक सलीम संगत्रास, सहाय्यक संचालक सी. आय. हुगार आदी उपस्थित होते.