For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आता शेतातच समजणार पिकांवरील रोगाचा प्रादुर्भाव

05:47 PM Mar 20, 2025 IST | Pooja Marathe
आता शेतातच समजणार पिकांवरील रोगाचा प्रादुर्भाव
Advertisement

कृत्रिम बुद्धिमत्ताआधारित उपकरण संशोधनाला मिळाले पेटंट

Advertisement

कोल्हापूर

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून मानवी जीवन अधिकाधिक सुखकर करण्याचे प्रयत्न जगात सर्वदूर सुरू आहेत. त्यामध्ये आता शिवाजी विद्यापीठाशी संबंधित संशोधकांचाही समावेश झाला आहे.या संशोधनामुळे शेतात उभ्या पिकांवर कोणत्या रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे, हे थेट शेतामध्येच समजणार आहे.या अभिनव संशोधनाला भारत सरकारचे पेटंट प्राप्त झाले आहे.

Advertisement

शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय, म्हसवड येथील डॉ.सुजीत जाधव, कृष्णा महाविद्यालय, रेठरे येथील डॉ. सुनीता जाधव, विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे सहाय्यक ग्रंथपाल डॉ. शिवराज थोरात, लंडनच्या क्विन्स मेरी युनिव्हर्सिटीत एम.एस. (ए.आय.)चे शिक्षण घेत असलेले ऋतुराज जाधव आणि राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इस्लामपूर येथे बी.ई. (इलेक्ट्रीकल)चे शिक्षण घेत असलेले पृथ्वीराज जाधव यांनी या संदर्भातील संशोधन केले आहे. त्यांच्या ‘ए.आय. बेस्ड डिव्हाईस फॉर डिटेक्शन ऑफ प्लांट डिसिजेस‘ या संशोधनाला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून पेटंट जाहीर करण्यात आले आहे.

विविध पिकांवर सापडणारे आणि हवेतून संक्रमण करू शकणारे वेगवेगळ्या रोगांचे विषाणू शोधण्यासाठी आणि ओळखण्यासाठी टिळक एअर सॅम्पलर वापरला जातो. हे सॅम्पलर शेतात ठेवून सॅम्पल गोळा केले जातात आणि नंतर प्रयोगशाळेमध्ये आणून तज्ञांच्या मदतीने ओळखले जातात, अशी आजपर्यंतची प्रक्रिया आहे. तथापि, सदर नवीन संशोधनानुसार टिळक सॅम्पलरमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे शेतकऱ्यांना शेतामध्येच पिकांवर कोणत्या प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे, हे ओळखता येईल आणि त्यानुसार त्वरित उपाययोजना करता येतील.अशा पद्धतीचे हे नावीन्यपूर्ण आणि शेतकऱ्यांना उपयुक्त संशोधन आहे. त्यावर उपयुक्तता पेटंट देखील मिळविण्याचा मानस डॉ. थोरात यांनी व्यक्त केला.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के, प्र-कुलगुरू डॉ.पी.एस.पाटील, कुलसचिव डॉ. व्ही.एन.शिंदे, शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले,कृष्णा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सी.बी.साळुंखे, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, प्राचार्य, डॉ. संजय दीक्षित यांनी सर्व संशोधकांचे अभिनंदन केले आहे.

Advertisement
Tags :

.