Satara Crop Damage Survey: पावसाचा जोर मंदावला, आता नुकसानीच्या पंचनाम्यांना वेग
धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नुकसानीचे पंचनामे सुरू झालेत
सातारा : गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेला मान्सूनपूर्व पाऊस मंगळवारी काहीसा कमी झाला. जिह्यातील अति पावसाच्या भागासह दुष्काळी भागाला पावसाने चांगलेच झोडपून काढले होते. जनजीवन ठप्प झाले होते. सोमवारी सायंकाळपासून सातारा, जावळी, वाई, कराड या तालुक्यात उघडीप दिली गेली.
मंगळवारी सकाळपासून जिह्याच्या कानाकोपऱ्यात पावसाने उघडीप दिल्याचे चित्र होते. 27 रोजी सकाळी आलेल्या पावसाच्या नोंदीमध्ये सातारा जिह्यात सरासरी 19.7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत.
गेल्या आठ दिवसात जिह्यातील सातारा, जावळी, कराड, कोरेगाव, वाई या अति पावसाच्या तालुक्यातील गावांसह दुष्काळी माण, खटाव, फलटण या तालुक्यातील गावांना चांगलेच झोडपून काढले. त्यामध्ये रस्ते, नाले, ओढे, नद्या तुडुंब भरून वाहू लागले होते. तसेच शेतात पाण्याचे तळे निर्माण झाले होते.
शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनाही विजेचा शॉक लागून मृत्यूला सामोरे जावे लागल्याच्या घटना जिह्यात घडल्या होत्या. दरम्यान, झालेल्या पावसात पंधराहून अधिक घरांची पडझड झाली. 150 कोंबड्या मृत्यू पावल्या होत्या. 6 पशुधन दगावले आहे. सातारा शहर व तालुक्यात सोमवारी पावसाचा जोर कमी झाला.
मंगळवारी दुष्काळी तालुक्यातील जोर कमी झाला. सातारा 19.7, जावली 24.7, पाटण 8.8, कराड 11.1, कोरेगाव 25.6, खटाव 17.9, माण 16.9, फलटण 9.1, खंडाळा 14.0, वाई 15.2, महाबळेश्वर 18.9, सातारा 16.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच धरणाच्या पाणी पातळीत झालेली वाढ पाहता मंगळवारी सकाळी 10 वाजेपर्यंत असलेला धरणातील पाणीसाठा कोयना 19.19 टीएमसी, धोम 2.82 टीएमसी बलकवडी 0.620 टीएमसी, कण्हेर 3.310 टीएमसी, उरमोडी 3.520 टीएमसी, तारळी 1.300 टीएमसी, येरळवाडी 0.692 टीएमसी, नेर 0.416 टीएमसी, राणंद 0.227 टीएमसी, आंधळी 0.262 टीएमसी, नागेवाडी 0.074 टीएमसी, मोरणा 0.531 टीएमसी, उत्तरमांड 0.361 टीएमसी, महू 0.290 टीएमसी, हातगेघर 0.065 टीएमसी, वांग- मराठवाडी 0.930 टीएमसी एवढा होता.
फलटण तालुक्यातील 40 कुटुंबांचे स्थलांतर
फलटण तालुक्यामध्ये 24 आणि 25 मे रोजी पडलेल्या अतिवृष्टीमुळे शहर आणि ग्रामीण भागामध्ये बिकट परिस्थिती निर्माण झालेली होती. फलटण शहरातून वाहण्राया बाणगंगा नदीला तसेच अनेक ओढ्यानाल्यांना पूर आलेले होते. खबरदारीचा उपाय म्हणून फलटण शहरातून शनी नगरभागातून सुमारे 40 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.
त्याशिवाय मौजे खुंटे येथील हनुमान नगर परिसरातून 28 कुटुंबे, मौजे हणमंतवाडी येथील 15 कुटुंबे, मौजे गोखळी पाटी येथील 12 कुटुंबे, मौजे मुरूम येथील 10 कुटुंबे, मौजे सरडे येथील 11 कुटुंबे यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. सस्तेवाडी येथील एक कुटुंब पाण्याने वेढलेल्या अवस्थेत होते. त्यासाठी राष्ट्रीय आपत्ती सुरक्षा दल फलटण येथे दाखल झाले होते.
तथापि दल दाखल होण्यापूर्वीच पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने सदर कुटुंब सुरक्षित बाहेर पडले. त्याशिवाय मौजे दुधेबावी आणि मौजे भाडळी खुर्द या दोन ओढ्याच्यामध्ये अडकलेल्या खासगी वाहनातील परगावातील अंदाजे 50 व्यक्तींची रात्री राहण्याची आणि जेवण्याची सोय प्रशासनातर्फे यांच्यातर्फे करण्यात आली. तसेच मौजे मिर्ढे आणि मौजे जावली येथ अडकलेल्या राज्य परिवहन महामार्गाच्या बसमधील सुमारे 64 प्रवाशांची रात्री राहण्याची आणि जेवण्याची सोय देखील प्रशासनातर्फे करण्यात आली.
फलटणची पाईपलाईनची दुरुस्ती
फलटण शहरातील मलटण परिसराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे वाहून गेली होती. परंतु फलटण नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीने 24 तासांमध्ये पाईपलाईन दुरुस्त करून सर्व शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत केला.