वाई तालुक्यात पावसामुळे पिकांचे नुकसान
वाई :
गेल्या काही दिवसांपासून सुरु झालेल्या परतीच्या धुवांधार पावसामुळे वाई तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचा पिकांवर मोठा विपरीत परिणाम झाला असून हातातोंडाशी आलेली खरिपाची पिके वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. काही ठिकाणी पिके कुजू लागली आहेत, तर पिके अतिपाण्यामुळे पिवळी पडली आहेत. वाईच्या पश्चिम भागातील भात पिकांसाठी पोषक वातावरण असले तरी सोयाबीन, घेवडा, मूग, चवळी, भुईमूग बटाटा कुजून चालला आहे. वरूणराजा आता बस झाले थांब आता अशी म्हणण्याची वेळ बळीराजावर आली असल्याचे चित्र सध्या वाई तालुक्यात दिसत आहे. शेतातील पाणीच निघत नसल्याने अनेकांना त्यामुळे अडचणीचा सामना करावा लागला आहे.
जनावरांचा चारा वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच प्रचंड पावसामुळे नवीन बनविलेले रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, ढगफुटीसारखा पाऊस कोसळत होता. पावसामुळे खरीप हंगामातील कोरडवाहू जमिनीतील पिकांना थोडासा दिलासा मिळाला असला तरीही इतर पिकांचे नुकसान झाले आहे. बळीराजाला डोक्याला हात लावून बसण्याची वेळ आली आहे. बियांना सह खत, रोजंदारीसाठी हजारो रुपये खर्च झालेले पिक हातातून निघून गेल्याने आर्थिक फटका मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. घेवडा, सोयाबीन, उडीद वाटाणा, ही पिके शेतातच कुजल्याने त्याचा उत्पन्नावर परिणाम झाला आहे, तर काही पिकांची वाढच झाली नाही, ज्या ठिकाणी पेरणी उशिरा झाली आहे ते पिक उगवलेच नाही अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कृषी विभागाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त नुकसान भरपाई मिळावी, यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत अशी मागणी करण्यात येत आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशीही मागणी जोर धरत आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचे जीवनमानच बदलून गेले आहे. तर शेतात मालच नाही विकायचं काय हा प्रश्न बागायती शेतकऱ्यांना पडला आहे, हळद-ऊस या पिकांवर सुद्धा अतिवृष्टीचा विपरीत परिणाम दिसू लागले आहेत. एकंदरीत आसमानी संकट कोसळल्याने बाजारात मात्र स्मशान शांतता आहे