For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Crocodile in Sarud: थेट वस्तीत शिरली मगर, ग्रामस्थांना फुटला घाम, वाचा मध्यरात्री रंगलेला थरार

05:42 PM Jun 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
crocodile in sarud  थेट वस्तीत शिरली मगर  ग्रामस्थांना फुटला घाम  वाचा मध्यरात्री रंगलेला थरार
Advertisement

मगर अडगळीच्या ठिकाणी गेल्याने पकडता येत नव्हती, मात्र...

Advertisement

By : अनिल पाटील

सरुड : सरुड (ता . शाहूवाडी) येथे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास सुमारे ७ फुट लांबीची पुर्ण वाढ झालेली मगर नागरी वस्तीत आढळून आल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तब्बल दोन तास या मगरीला पकडण्याचा थरार अनुभवला. दोन तासांच्या प्रयत्नानंतर शुक्रवारी पहाटे चार वाजता या मगरीस पकडण्यात स्थानिक नागरिकांना यश आले.

Advertisement

याबाबत अधिक माहिती अशी, सरुड येथील चरणवाड्यातील लाड गल्लीत गुरुवारी मध्यरात्रीनंतर कुत्र्यांचा मोठ्याने भुंकण्याचा आवाज येऊ लागला. आवाजामुळे गल्लीतील नागरिक जागे होऊन बाहेर आले. त्यावेळी त्यांना रस्त्यावर सुमारे ७ फुट लांबीची भल्ली मोठी मगर आढळून आली. सैन्यदलातून सुट्टीवर आलेले जवान स्थानिक नागरिक जयदिप लाड यांना तातडीने फोनवरून वनविभागाचे वनपाल नाथा पाटील यांच्याशी संपर्क केला.

दरम्यान, मगर रस्त्याशेजारी असणाऱ्या राजाराम लाड यांच्या जनावरांच्या शेडाकडे जाऊ लागताच गोसावी समाजातील सावकर जाधव, संपत जाधव, विशाल जाधव, सुनिल जाधव, अमर जाधव , जयदिप लाड, सचिन लाड, संपत लाड, राजाराम लाड, संजय लाड, आनंदा लाड, प्रकाश बंडगर, नथुराम बंडगर आणि गल्लीतील नागरिकांनी मगरीस प्रसंगावधान राखत दोरीच्या साहाय्याने पकडण्याचा प्रयत्न केला.

मगर रस्त्याशेजारील अडगळीच्या ठिकाणी गेल्याने तिला पकडण्यात व्यत्यय येत होता. अखेर मगर पुन्हा रस्त्यावर येताच दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर मगरीला जेरबंद करण्यात नागरिकांना यश आले. दरम्यान, पहाटे साडेपाचच्या सुमारास वनरक्षक एस. एस. शिरसाट व वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर नागरिकांनी मगर त्यांच्या ताब्यात दिली. वनविभागाच्या पथकाकडून मगरीला नैसर्गिक अधिवासात सोडली आहे.

मगर आली कोठून?

मगर कडवी नदीतुन आल्याचा अदांज स्थानिक नागरिकांसह वनविभागाने दर्शवला आहे. गावातील सांडपाणी ज्या ओढ्यातून कडवी नदीमध्ये जाते, त्याच ओढ्याच्या प्रवाहातून नाल्याद्वारे मगर नागरी वस्तीत आली असण्याची शक्यता वनविभागाकडून व्यक्त केली जात आहे.

सरुडमध्ये दुसऱ्यांदा नागरी वस्तीत मगरीचा शिरकाव

मागील दहा वर्षाच्या काळात सरुडमध्ये दुसऱ्यांदा मगरीने नागरी वस्तीत शिरकाव केला आहे. यापुर्वी २०१५ मध्ये मध्यरात्रीच्या सुमारासच येथील नवीन वसाहतीतील नागरी वस्तीत मगर आदळून आली होती. मगर सरुडच्या गाव तलावातून आली होती. नागरी वस्तीत मगरी येऊ लगल्याने गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisement
Tags :

.