वारणेत दुषित पाण्यामुळे मगरीचा मृत्यू
दुधगाव बंधाऱ्याजवळ मृत माशांचा खर्च
कोल्हापूर
वारणा नदी मध्ये शनिवारी संध्याकाळी मिरज तालुक्यातील दुधगाव हद्दीत बंधाऱ्यानजीक मोठ्या प्रमाणात मळीसदृश रसायनयुक्त दुषित पाणी आल्यामुळे नदीपात्रात मोठया प्रमाणात मासे मृत्युमुखी पडले असून एका मगरीचाही मृत्यू झाला आहे. रविवारी वन विभागाने मगर मृत्यूची गंभीर दखल घेत पाहणी केली. तर प्रदूषण नियंत्रण विभागाचे दुर्लक्ष असल्याचे स्पष्ट झाले.
गेल्या काही दिवसांत दुधगाव आणि मिरज पश्चिम भागातील गावात डेंगू सदृश ऊग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच नदीपात्रात मळी मिश्रित झाल्यामुळे मासे, मगर मृत्युमुखी पडली आहे. रविवारी बंधाऱ्याजवळ मृत माशांचा खच पडल्याचे आणि त्यामुळे दुर्गंधी पसरल्याचे दिसून आले. त्यातच मगरीचाही मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

वारणा नदीत आरोग्याला धोकादायक रसायनांचा अंश असलेले पाणी मिसळत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळ सोयीस्करपणाने दुर्लक्ष करत असल्याचेही दिसून आले आहे. प्रत्येक वर्षी साखर कारखाने सुरू झाल्यानंतर मळी मिश्रित पाणी वारणा नदीत सोडले जाते असा नदीकाठावरील ग्रामस्थांचा आरोप आहे. अलिकडे पाण्यात जहाल रसायन मिसळत असल्यामुळे हजारो मासे वर्षाला मरत आहेत. नदीपात्रात सोडणाऱ्या घातक रसायनामुळे मगरीला देखील जीव गमवावा लागत आहे. याला जबाबदार कोण? याची चर्चा नदी परिसरात सुरू आहे.वारणा नदीत नेमके बंधाऱ्याजवळ मासे मृत आढळले असल्याने हे प्रदूषण कसे झाले ते शोधावे, अशी ग्रामस्थांतून मागणी होत आहे.
प्रदूषण मंडळ कठोर कारवाई करणार का?
प्रत्येक वर्षी कारखाने मळी मिश्रित पाणी वारणा नदीच्या पात्रता सोडून रिकामे होतात. या कारखान्यावर कारवाई कधी होणार? अशी विचारणा लोक करत आहेत. प्रदूषण नियंत्रण विभाग या प्रकरणात संबंधितांना पाठीशी घालतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मगरीचा मृत्यू झाल्यामुळे वनविभागाला देखील याचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा लागणार आहे. मगर हा संवेदनशील जलचर मानला जात असल्याने वनविभाग कोणती कारवाई करणार, या पाण्याचा पुढे हरिपूर व इतर गावातील जलचरांवर काय परिणाम होणार याची चिंता लोक करीत आहेत.