सुसंस्कृत सावंतवाडीचे रूपांतर युपी, बिहारच्या बाहुबली संस्कृतीत
सामाजिक कार्यकर्ते डॉ . जयेंद्र परुळेकरांचा टोला
सावंतवाडी । प्रतिनिधी
सिंधुदुर्गातील इतर नगरपरिषदेंसह सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणूका पार पडल्या. निवडणुकीदिवशी सावंतवाडीत झालेला तमाशा म्हणजे संविधानाचा आणि लोकशाहीचा अवमानच आहे. त्यामुळे झालेल्या तमाशा निवडणूका म्हणणे संविधानाचा आणि लोकशाहीचा अवमानच आहे. सुसंस्कृत सावंतवाडीचे रुपांतर आता उत्तर प्रदेश आणि बिहार मधील एखाद्या गाववजा शहरा सारखं झालेलं आहे असा टोला सामाजिक कार्यकर्ते डॉ . जयेंद्र परुळेकर यांनी लगावला . सावंतवाडी शहरात आता उत्तरप्रदेश आणि बिहारच्या संस्कृती प्रमाणे बाहुबली संस्कृतीची सुरुवात झालेली आहे.भूमाफिया,अंमली पदार्थांची तस्करी करणारे बाहुबली तिथे गेली तीन चार दशके राजकारणात सक्रिय होतेच पण आता सावंतवाडीत देखील ह्या संस्कृतीची नांदी झालेली दिसत आहे.हळूहळू सावंतवाडीतील युवकांकडे रिव्हाॅल्वर्स दिसू लागतील आणि मया सगळ्यात एखाद्याचा मर्डर झाला तर आश्चर्य वाटायला नको असेही ते म्हणाले . १९ हजार ५०० मतदार संख्या असणाऱ्या क श्रेणी सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी २० ते २५ कोटी रूपये मतदारांना अवैधरितीने वाटण्यासाठी काही पक्षांकडून आणले गेले . त्यामुळे याच धनशक्तीचा वापर करून सत्ता हस्तगत करून पुढील पाच वर्षांत दोनशे अडिचशे कोटी लुटण्याचा कुटील डाव यामागे आहे असेही आरोप डॉ . परुळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे .आता खरा खेळ सुरू होईल आणि सावंतवाडीतील सामान्य जनतेला तो बघत राहण्याशिवाय कुठलाही पर्याय नसणार असे डॉ जयेंद्र परुळेकर यांनी टोला हाणला .