For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टीका रास्तच, माझी कामगिरी चांगली झालेली नाही : डी. गुकेश

06:37 AM May 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
टीका रास्तच  माझी कामगिरी चांगली झालेली नाही   डी  गुकेश
Advertisement

वृत्तसंस्था 

Advertisement

ओस्लो : विद्यमान विश्वविजेता डी. गुकेश हा गेल्या 18 महिन्यांत आपल्यावर झालेल्या टीकेच्या वर्षावामुळे जराही विचलित झालेला नाही. उलट या तऊण भारतीय ग्रँडमास्टरचे असे मानणे आहे की, त्याचा सध्याचा खराब फॉर्म पाहता ही सर्व टीका अगदी रास्तच आहे.

29 मे रोजी वयाची 20 वर्षे पूर्ण करणारा गुकेश नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येथे आला असून जर्मनीच्या व्हिन्सेंट कीमरविऊद्ध तो आपल्या मोहिमेची सुऊवात करेल. या वर्षाच्या उत्तरार्धात आव्हानवीर जावोखिर सिंदारोव्हविऊद्ध होणाऱ्या आपल्या विश्वविजेतेपदाच्या लढतीपूर्वी आपली कामगिरी सुधारून काही दमदार निकाल नोंदवण्यास तो नक्कीच उत्सुक असेल.

Advertisement

बहुतांश टीका (माजी दिग्गज खेळाडूंनी केलेल्या टीकात्मक टिप्पण्या) मी पाहत नाही, पण काही गोष्टी माझ्या कानावर पडल्या आहेत आणि मला वाटते की, त्या योग्यच आहेत, असे गुकेशने सांगितले. गेल्या दीड वर्षात माझी कामगिरी चांगली झालेली नाही. खरे तर माझी कामगिरी अपेक्षांच्या खूपच खाली राहिली आहे असेच मी म्हणेन. त्यांना (टीकाकारांना) जे वाटते ते बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि मला माझे सर्वोत्तम योगदान देण्याचा अधिकार आहे, असे हा मितभाषी किशोरवयीन खेळाडू म्हणाला. विशेष म्हणजे तो हे बोलत असताना त्याच्या टीकाकारांपैकी एक असलेला माजी विश्वविजेता मॅग्नस कार्लसन त्याच्या शेजारीच बसला होता.

विश्व क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला कार्लसन आपल्या मायभूमीवर नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद आठव्यांदा पटकावून आपला विक्रम अधिक उंचावण्याच्या प्रयत्नात आहे. या वर्षी गुकेशने टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत 10 वे स्थान मिळवले, त्यानंतर प्राग आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महोत्सवात नववे स्थान पटकावले आणि अगदी अलीकडील ‘ग्रँड चेस टूर’वरील सुपरबेट रॅपिड आणि ब्लिट्झ पोलंड स्पर्धेत तो सहाव्या स्थानी राहिला. ‘ग्रँड चेस टूर’वरील सर्व ‘क्लासिकल’ प्रकारच्या स्पर्धांमधून त्याने माघार घेतली असून सिंदारोव्हविऊद्धच्या विश्वविजेतेपदाच्या लढतीपूर्वी तूर्तास तो केवळ नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा आणि बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्येच खेळणार आहे.

दीर्घकाळापासून सुरू असलेल्या सुमार कामगिरीमुळे गुकेशने 2024 मध्ये चीनच्या डिंग लिरेनला हरवून मिळवलेल्या विश्वविजेतेपदाचे महत्त्व काहीसे कमी लेखले जात आहे. रशियाचा ग्रँडमास्टर इयान नेपोम्नियाचीसारख्या खेळाडूंचे असे मानणे आहे की, हा भारतीय खेळाडू काही वेळा अत्यंत सुमार खेळ करतो. माजी विश्वविजेता अनातोली कार्पोव्ह यांनी तर याही पुढे जाऊन असे विधान केले आहे की, गुकेशने हे अत्यंत प्रतिष्ठित विजेतेपद केवळ योगायोगाने मिळवले आहे.

Advertisement
Tags :

.