मराठेशाहीचा चिकित्सक इतिहासकार हरपला
महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन क्षेत्रात आपल्या अभ्यासपूर्ण, चिकित्सक, तटस्थ दृष्टिकोनामुळे वेगळे स्थान निर्माण करणारे डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन ही केवळ एका व्यक्तीची हानी नसून संपूर्ण इतिहासविश्वासाठी मोठी पोकळी निर्माण करणारी घटना आहे. इतिहास म्हणजे केवळ भूतकाळाचे गौरवगान नव्हे, तर तो पुराव्यांच्या आधारे समजून घेण्याची आणि मांडण्याची एक शास्त्राrय प्रक्रिया आहे, ही जाणीव त्यांनी आपल्या आयुष्यभराच्या कार्यातून दृढ केली. सांगली जिह्यातील तडसरसारख्या छोट्याशा गावातून शिक्षणाची आस घेऊन ते कोल्हापूरमध्ये आले. वसतीगृहात राहून त्यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासाची जडणघडण केली. प्रतिकूल परिस्थितीतही ज्ञानाचा ध्यास त्यांनी कधी सोडला नाही. याच काळात त्यांना डॉ. आप्पासाहेब पवार यांसारख्या थोर इतिहास संशोधकाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या सहवासात काम करताना डॉ. जयसिंगराव पवार यांनी चिकित्सक इतिहासलेखनाचे बारकावे आत्मसात केले. पुराव्यांवर आधारित, विवेकनिष्ठ आणि तटस्थ इतिहासदृष्टीची पायाभरणी याच टप्प्यात झाली. डॉ. पवार यांनी मराठेशाही, शिवकाल आणि महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक इतिहासाचा घेतलेला वेध अत्यंत अभ्यासपूर्ण होता. त्यांनी इतिहासातील प्रत्येक घटनेकडे भावनिकतेपेक्षा विवेकाच्या नजरेतून पाहिले. त्यामुळे त्यांचे संशोधन हे केवळ माहितीपुरते मर्यादित न राहता, विचारांना चालना देणारे ठरले. इतिहासाच्या अभ्यासात त्यांनी ‘पुरावा’ हा केंद्रबिंदू मानला आणि कोणतीही मांडणी करताना दस्तऐवज, पत्रव्यवहार आणि उपलब्ध साधनांचा बारकाईने अभ्यास केला. याच चिकित्सक दृष्टीकोनातून त्यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचा आयुष्यभर ध्यास घेतला. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शाहू महाराजांच्या जीवनाचा सर्वांगीण अभ्यास करण्यासाठी अर्पण केले. या अखंड साधनेतून शाहू महाराजांच्या जीवनकार्याचा सखोल आणि व्यापक वेध घेणारे पाच खंडांचे चरित्र साकार झाले, जे इतिहास संशोधन क्षेत्रातील एक मोलाचा ठेवा मानले जाते. शाहू महाराजांचे सामाजिक न्याय, शिक्षणविस्तार आणि बहुजनोद्धार यांसाठीचे योगदान त्यांनी केवळ गौरवात्मक पद्धतीने न मांडता, त्यामागील सामाजिक-राजकीय संदर्भ स्पष्ट केले. कोल्हापूर संस्थानातील धोरणे, आरक्षणाचा प्रारंभ, अस्पृश्यता निर्मूलनासाठीचे प्रयत्न आणि शिक्षणाचा प्रसार या सर्व बाबींचा त्यांनी दस्तऐवजांच्या आधारे सखोल अभ्यास करून मांडणी केली. विशेष म्हणजे, साधार पुराव्यांच्या आधारे त्यांनी शाहू महाराजांची बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुटील प्रवाहांना ठामपणे प्रत्युत्तर दिले आणि ऐतिहासिक सत्य अधोरेखित केले. त्यांच्या संशोधनाची एक महत्त्वपूर्ण निष्पत्ती म्हणजे ‘महाराणी ताराबाई’ हा ग्रंथ. अत्यंत चिकित्सक वृत्तीने तयार झालेला हा ग्रंथ मराठ्यांच्या इतिहासातील स्त्राrकर्तृत्व सिद्ध करणारा पहिला संशोधनात्मक ग्रंथ ठरला. महाराणी ताराबाई यांच्या औरंगजेबाविरुद्धच्या दीर्घ लष्करी व राजनैतिक लढ्याचे त्यांनी नवीन कागदपत्रांच्या आधारे विश्लेषण केले. तसेच जदुनाथ सरकार, सरदेसाई यांसारख्या इतिहासकारांच्या मांडणीचे खंडण करून स्वातंत्र्ययुद्धाच्या इतिहासाची पुनर्मांडणी केली. या ग्रंथामुळे मराठ्यांच्या इतिहासातील स्त्राr-प्रणीत लेखनाला नवे दालन खुले झाले आणि त्याला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कारही प्राप्त झाला. मराठ्यांच्या इतिहासातील अन्याय झालेलं आणखी एक व्यक्तिमत्त्व म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. त्यांच्या इतिहासातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न डॉ. पवार यांनी स्मारक ग्रंथाद्वारे केला. या ग्रंथाच्या प्रस्तावनेत त्यांनी विविध बखरकार, इतिहासकार आणि साहित्यिकांच्या लिखाणाचा चिकित्सक परामर्श घेतला. विशेषत: छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यातील संबंधांवरील गैरसमजांचा त्यांनी ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे उलगडा करून संतुलित दृष्टीकोन मांडला. याचप्रमाणे ‘सेनापती संताजी घोरपडे’ हा त्यांचा आणखी एक महत्त्वपूर्ण ग्रंथ ठरला. संताजी घोरपडे यांच्या पराक्रम, असामान्य नेतृत्व आणि गनिमी काव्याच्या कौशल्याचा त्यांनी मोगलकालीन कागदपत्रे व पुराभिलेखांच्या आधारे सखोल अभ्यास केला. ‘मराठेशाहीचा मागोवा’ या ग्रंथातून त्यांनी अनेक दुर्लक्षित घटना व अज्ञात व्यक्तिमत्त्वे प्रकाशात आणत इतिहासाला नवे संदर्भ दिले. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील प्रतिसरकारच्या मंतरलेल्या पर्वाची साधार माहिती क्रांतिसिंह नाना पाटील स्मारक ग्रंथातून दिली. 1992 साली त्यांनी ‘महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी’ची स्थापना करून इतिहासाद्वारे समाजप्रबोधनाचा ध्यास घेतला. तसेच ‘अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद’ या संस्थेचे ते पहिले संस्थापक अध्यक्ष होते. परिषदेत सादर होणारे शोधनिबंध पुढील अधिवेशनात प्रकाशित करण्याची परंपरा त्यांनी सुरू केली, जी आजही संशोधनपरंपरेला बळकटी देत आहे. शिवाजी विद्यापीठात आपले गुरु डॉ. आप्पासाहेब पवार यांनी स्थापन केलेल्या शाहू संशोधन केंद्राचे ते दीर्घकाळ संचालक होते. केवळ एक रुपया मानधन घेऊन त्यांनी या केंद्राच्या कार्यात सहभाग घेतला. नव्या संशोधकांना मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले. ‘राजर्षी शाहू साहित्य माला’द्वारे अनेक दुर्मिळ दस्तऐवज प्रकाशित करण्याचे कार्यही त्यांनी केले. संशोधन ही केवळ वैयक्तिक साधना नसून ती एक परंपरा आहे, याची जाणीव ठेवून त्यांनी पुढील पिढी तयार करण्यावर विशेष भर दिला. आजच्या काळात इतिहासाचे कप्पेकरण, दंतकथाकरण आणि आत्मगौरवीकरण मोठ्या प्रमाणात होताना दिसते. अशावेळी डॉ. पवार यांची तटस्थ आणि चिकित्सक भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. त्यांनी इतिहासाकडे कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय पाहण्याचा आग्रह धरला. त्यांच्या लेखनातून आणि व्याख्यानांतून इतिहासाचे वस्तुनिष्ठ विश्लेषण कसे करावे, याचा आदर्श अभ्यासकांसमोर ठेवला. इतिहास संशोधन हे येरागबाळयाचे काम नसून त्यासाठी आयुष्यभराची साधना लागते, हे त्यांनी सिद्ध केले. एका विषयाचा ध्यास घेऊन त्यात स्वत:ला झोकून देण्याची परंपरा महाराष्ट्रात पूर्वीपासून आहे. डॉ. पवार हे त्या परंपरेचे खरे प्रतिनिधी होते. त्यांनी आपल्या आयुष्याचा मोठा भाग मराठेशाही आणि शाहू काळाच्या इतिहासाच्या अभ्यासासाठी अर्पण केला. त्यांच्या संशोधनामुळे अनेक ऐतिहासिक प्रश्नांना नवे दृष्टिकोन मिळाले. त्यांनी केवळ माहिती संकलित न करता तिचे चिकित्सक विश्लेषण करून अभ्यासकांना विचार करायला भाग पाडले. त्यामुळे त्यांचे कार्य केवळ इतिहासापुरते मर्यादित न राहता बौद्धिक परंपरेचा एक महत्त्वाचा भाग बनले आहे. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.