कमला हॅरिस अध्यक्ष झाल्यास इस्रायलवर संकट
ज्यूंसाठी डेमोक्रेट्स सर्वात मोठा धोका : ट्रम्प
वृत्तसंस्था/ लास व्हेगास
डेमोक्रेटिक नेत्या कमला हॅरिस निवडणुकीत विजयी होऊन अध्यक्ष झाल्या तर इस्रायलचे अस्तित्व समाप्त होणार असल्याचा दावा अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प यांनी लास व्हेगासमध्ये रिपब्लिकन ज्यू आघाडीच्या वार्षिक संमेलनाला संबोधित करताना हा दावा केला आहे.
कमला हॅरिस या अध्यक्ष झाल्यावर इस्रायलला विसरून जातील. यानंतर दहशतवादी संघटना ज्यूंना त्यांच्या भागातून हाकलण्यासाठी युद्ध सुरू करतील. ज्यूंना हा धोका ओळखावा लागणार आहे. तसेच स्वत:च्या लोकांना ही बाब समजावून सांगावी लागणार आहे. अनेक ज्यूंना आपण काय करतोय याची जाणीव नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
ज्यूविरोधी संस्थांचा वित्तपुरवठा रोखणार
मी जर अध्यक्ष झालो तर प्रत्येक दहशतवादी तळावर शरणार्थींची एंट्री बंद करणार आहे. तसेच शासकीय संपत्तीला नुकसान पोहोचविणाऱ्या ‘हमास समर्थक’ गुंडांना तुरुंगात डांबणार आहे. ज्यूविरोधी प्रचार करणाऱ्या संस्था आणि विद्यापीठांना मिळणारा वित्तपुरवठा रोखून त्यांची मान्यता रद्द करणार असल्याचे आश्वासन ट्रम्प यांनी ज्यूधर्मीयांना दिले आहे.
कुठलाही ज्यू डेमोक्रेटिक पार्टीला पाठिंबा कसा देऊ शकतो? जर तुम्ही ज्यू आहात आणि डेमोक्रेटिक पार्टीचे समर्थन करत असाल तर तुमच्या मेंदूची तपासणी करण्याची गरज आहे. डेमोक्रेटिक पार्टी ज्यूंसोबत अत्यंत वाईटप्रकारे वागत आहे. 2016 मध्ये आम्हाला ज्यूंची 25 टक्के मते मिळाली. तर 2020 मध्ये 26 टक्के मते मिळाली होती. प्रत्यक्षात इस्रायलसाठी कुठल्याही डेमोक्रेटिक अध्यक्षापेक्षा मी अधिक काम केले आहे. यंदा मला 50 टक्के ज्यू मते मिळतील अशी अपेक्षा आहे. डेमोक्रेटिक पार्टी इस्रायलचा द्वेष करते, ज्यू त्यांना पसंत नाहीत. मी अध्यक्ष असताना ज्यू स्वत:ला अधिक सुरक्षित मानत होते असा दावाही ट्रम्प यांनी केला आहे.
राष्ट्रवादाचे ट्रम्प कार्ड
ट्रम्प यांना राष्ट्रवादाच्या मुद्द्यामुळे राजकीय लाभ होत आहे. ट्रम्प यांनी 10 दिवसांत प्रचाराचे चित्र बदलले आहे. आता ट्रम्प हे 7 सर्वात महत्त्वपूर्ण प्रांतांपैकी (स्विंग स्टेट्स) 4 मध्ये कमला हॅरिस यांच्या बरोबरीच्या स्तरावर आले आहेत. 10 दिवसांपूर्वीपर्यंत ट्रम्प या सर्व 7 प्रांतांमध्ये हॅरिस यांच्या तुलनेत पिछाडीवर पडले होते. ट्रम्प यांनी आता स्वत:च्या प्रचारमोहिमेला मागा (मेक अमेरिका ग्रेट अगेन)च्या अवतीभवती ठेवले आहे. स्वत:च्या प्रत्येक सभेत ट्रम्प हे राष्ट्रवादाशी निगडित मुद्दा उपस्थित करत आहेत.
10 सप्टेंबरला पहिली डिबेट
ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यातील पहिली अध्यक्षीय डिबेट 10 सप्टेंबर रोजी होणार आहे. यात दोन्ही उमेदवारांच्या कामगिरीनंतर अमेरिकच्या अध्यक्षीय निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. कारण त्यानंतर दोघांमध्ये कुठलीही डिबेट होणार नाही.