केएमटीवर संकट! आणखी 10 केएमटी बस स्क्रॅप...!
15 वर्षावरील बस असल्याने प्रशासनाचा निर्णय; मोबाईल टॉयलेट व्हॅनही झाली बंद; पुढील आठवड्यात आणखी 5 बस स्क्रॅप...आता 100 ‘ई’ बसची प्रतिक्षा
विनोद सावंत कोल्हापूर
केंद्राने 15 वर्षावरील वाहने स्क्रॅपच्या घेतलेल्या धोरणानुसार गतवर्षी 1 एप्रिलला 42 बस स्क्रॅप झाल्या. याच नियमानुसार 1 जानेवारीपासून 10 केएमटी बस स्क्रॅप झाल्या आहेत. पुढील आठवड्यात आणखीन 5 बस स्क्रॅप होणार आहेत. या निर्णयामुळे महापालिकेच्या केएमटी सेवेचे भवितव्य धोक्यात आले आहे.
तत्कालीन नगराध्यक्ष श्रीपतराव बोंद्रे यांनी शहरांतर्गत वाहतुकीसाठी 1 एप्रिल 1962 मध्ये केएमटीची स्थापना केली. प्रारंभी ही सेवा फायदा देणारी होती. परंतु नियोजनशुन्य कारभारामुळे केएमटी तोट्यात गेली. रोज 4 लाख रूपये तोटा होतो. कोरोनामध्ये केएमटी सेवा बंद राहिल्याने आर्थिक संकटात वाढच झाली. कोरोनानंतर केएमटी रूळावर येत असतानाच केंद्राने 15 वर्षावरील वाहने स्क्रॅपचा निर्णय घेतला. त्यामुळे केएमटीच्या 1 एप्रिल रोजी एकाचवेळी 42 बस स्क्रॅप झाल्या. त्यामुळे प्रशासनाने 10 हून अधिक मार्गावरील बस बंद केल्या. फेऱ्या बंद झाल्यामुळे मार्गस्थ बसमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली आहे. दरम्यान, आमदार फंडातून 9 एसी बस मिळाल्यामुळे केएमटीवरील ताण काहीअंशी कमी झाला. केएमटीची सेवा रूळावर येईल, असे चिन्ह असतानाच 1 जानेवारीपासून 10 बस स्क्रॅप झाल्या आहेत.
मोबाईल टॉयलेट व्हॅन बंद
केएमटीच्या 1 जानेवारीपासून बंद झालेल्या 10 बसपैकी बंद 7 बस आणि चालू स्थितील 2 बसचा समावेश आहे. सीसीआर फंडातून पेलेल्या मोबाईल टॉयलेट व्हॅनची बसही स्क्रॅप झाली आहे. आवश्यक ठिकाणी टॉयलेट बसचा वापर होत होता. आता मनपाला नव्याने टॉयलट व्हॅन करावी लागणार आहे.
जादा आसन क्षमता असणाऱ्याच बस स्क्रॅप
एसी 9 बस आल्या आणि दुसरीकडे 10 बस स्क्रॅप झाल्या. विशेष म्हणजे स्क्रॅप झालेल्या बसची आसन क्षमता नवीन बसच्या तुलनेत जादा आहे. त्यामुळे या बसमधून उत्पन्नही चांगले मिळत होते.
जुन्या बस स्क्रॅप, मंजूर 100 ई बस काही मिळेना
केंद्राकडून केएमटीला 100 ‘ई’ बस मिळणार आहेत. केंद्राने याची टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे. टेंडरला पुन्हा मुदत वाढ दिली आहे. दरम्यान, वर्कशॉपमध्ये चार्जिंग स्टेशन, ट्रॉन्सफॉर्मर, डेपो डेव्हलपमेंटसाठी आवश्यक सर्व प्रक्रिया केएमटी प्रशासनाकडून केली जात आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन 100 ई बस केव्हा मनपाकडे येणार हे सांगता येत नाही.
तरीही केएमटीच्या 68 बस मार्गस्थ
15 वर्षावरील 52 बस आतापर्यंत स्क्रॅप झाल्या आहेत. 1 जानेवारीपासून स्क्रॅप झालेल्या 10 बसपैकी 7 बस वापरातच नव्हत्या. दोन बस दोन दिवसांपूर्वी स्क्रॅप झाल्या. 1 बस मोबाईल टॉयलेट होती. तीही स्क्रॅप झाली. 12 जानेवारीला 3 बस स्क्रॅप होणार आहेत. महिनाअखेरीस आणखीन 2 बस स्क्रॅप होणार आहेत. गेल्या सहा महिन्यांत पांढऱ्या 75 बसपैकी खराब सुमारे 20 बस दुरूस्त करण्यात वर्कशॉपला यश आले. त्यामुळेच केएमटीच्या सध्या 68 बस मार्गस्थ आहेत. दीपक पाटील, वर्कशॉप प्रमुख, केएमटी
कोरोनापूर्वी सेवेत असणाऱ्या बस -101
स्क्रॅप झालेल्या बस -42
नव्याने दाखल झालेल्या एसी बस -9
1 जानेवारी 2023 पासून स्क्रॅप झालेल्या बस -10
महिन्यांत स्क्रॅप होणाऱ्या बस -5
सध्या मार्गस्थ बस -65