For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

म्यानमारमध्ये हिंदू, बौद्धांवर ओढवले संकट

06:50 AM May 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
म्यानमारमध्ये हिंदू  बौद्धांवर ओढवले संकट
Advertisement

5 हजार घरे पेटविली : सांप्रदायिक स्वरुप धारण करतेय गृहयुद्ध

Advertisement

वृत्तसंस्था/ नेपीडॉ

म्यानमारमध्ये अनेक महिन्यांपासून सुरू असलेले गृहयुद्ध आता भीषण रुप धारण करू लागल्याने स्थिती बिघडतेय. रखाइन प्रांतात स्थिती सर्वात गंभीर असून तेथे जुंटाच्या नेतृत्वाखालील म्यानमारचे सैन्य आणि वांशिक बंडखोर समुहांदरम्यान भीषण संघर्ष सुरू आहे. सैन्य संघर्ष आता सांप्रदायिक तणावात रुपांतरित झाल्याने या भागात राहणाऱ्या लोकांना फटका बसला आहे. बुथीदौंगमध्ये बौद्ध आणि हिंदूंची जवळपास 5 हजार घरे पेटवून देण्यात आली आहेत. बांगलादेशच्या सीमेपासून केवळ 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या या भागात बौद्ध आणि हिंदूंना लक्ष्य करण्यात येत आहे.

Advertisement

संघर्षामुळे बहुतांश लोकांनी यापूर्वीच सुरक्षित क्षेत्रांमध्ये पलायन केले आहे. यामुळे अनेक घरे ओस पडली आहेत. तर काही लोक अद्याप तेथे राहत आहेत. या लोकांसमोरच त्यांच्या घरांना लुटण्यात आले तसेच पेटवून देण्यात आले. या हिंसेसाठी जुंटा सैन्याकडून बांगलादेशात रोहिंग्या शिबिरामधून भरती करण्यात आलेल्या तरुणांचा वापर केला जातोय. जुंटा सैन्यात सैनिकांची निर्माण झालेली कमतरता पाहता रोहिंग्यांची भरती सुरू करण्यात आली आहे. या रोहिंग्यांना सैन्य राजवटीदरम्यान अत्याचारांना तोंड द्यावे लागले होते. लाखो रोहिंग्यांना सर्वस्व गमावून पलायन करावे लागले होते.

बंडखोरांचा ताबा

बुथीदौंग आता बंडखोर समूह अराकान सैन्याच्या पूर्ण नियंत्रणात आहे. बुथीदौंग आणि मौंगदामध्ये राहत असलेले बहुतांश स्थानिक मुस्लीम सांप्रदायिक संघर्षात सामील होण्यास तयार नाहीत. यातील काही जणांनी सुरक्षित क्षेत्रांमध्ये जाण्यासाठी बंडखोरांकडून मदत मागितली आहे. 2018 च्या जनगणनेनुसार बुथीदौंगमध्ये केवळ 3 हजार घरे होती. परंतु आता ही संख्या वाढून 10 हजार झाली आहे. अनेक जणांनी अन्य भागातील स्वत:चे घरदार सोडत येथे आश्रय घेतला आहे. येथील 50 टक्क्यांपेक्षा अधिक रहिवाशांमध्ये मुस्लीम असून उर्वरित बौद्ध आणि हिंदूधर्मीय आहेत.

रखाइनमध्ये सांप्रदायिक संघर्ष

रखाइन हा  सांप्रदायिक हिंसेने सर्वाधिक प्रभावित झालेला म्यानमारमधील प्रांत आहे. एक दशकापूर्वी येथे सांप्रदायिक तणाव भडकल्याने लाखो रोहिंग्यांचे पलायन झाले. मोठ्या संख्येत रोहिंग्यांनी बांगलादेशात आश्रय घेतला. सद्यकाळात 10 लाख रोहिंग्या बांगलादेशात असल्याचा अनुमान आहे. म्यानमारचे जुंटा सैन्य आता तेथील शरणार्थी शिबिरांमधून रोहिंग्या युवकांची बळजबरीने भरती करत आहे.

Advertisement
Tags :

.