पावसामुळे बेंगळूरमध्ये संकट
यलहंका, महादेवपूर विभागात ढगफुटीसदृश पाऊस : एनडीआरएफ, एसडीआरएफकडून बचावकार्य युद्धपातळीवर
प्रतिनिधी/ बेंगळूर
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गेल्या काही दिवसांपासून बेंगळूरसह राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील तीन दिवस पावसाचा जोर राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. बेंगळूर शहर परिसराला मागील तीन दिवसांपासून पावसाने झोडपले आहे. सोमवारी मध्यरात्री यलहंका, महादेवपूर विभागात ढगफुटीसदृश पाऊस झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने अग्निशमन दल, एनडीआरएफ, एसडीआरएफच्या जवानांकडून युद्धपातळीवर बचावकार्य हाती घेण्यात आले आहे.
बेंगळूरच्या यलहंका विभागात सोमवारी रात्री विक्रमी 42 मि. मी. पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. परिणामी, येथील 10 वसाहतींमध्ये पाणीच पाणी झाले असून 400 हून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. केंद्रीय विहार अपार्टमेंटमध्ये चार फुटांपेक्षा जास्त पाणी साचले आहे. त्यामुळे या भागातील 300 हून अधिक जणांना एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांनी बोटीतून सुरक्षित ठिकाणी नेले. बचावकार्यासाठी येथे 16 बोटींचा वापर करण्यात आला.
नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने अनेक ठिकाणी दूध, औषधे व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे. काही अपार्टमेंट सुरक्षेच्या दृष्टीने 8 दिवस बंद ठेवण्याची सूचना बेंगळूर महापालिकेने दिली आहे. 20-25 एचपी मोटरचा वापर करून गटारी स्वच्छ करण्याची काम हाती घेण्यात आले आहे. 20 ठिकाणी पाणी बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
इतर जिल्ह्यांतही मुसळधार
बेळगाव, धारवाड, गदग, हावेरी, बळ्ळारी, दावणगेरे, शिमोगा, चिक्कमंगळूर, चित्रदुर्ग, तुमकूर, बेंगळूर ग्रामीण जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस होत आहे. आणखी तीन दिवस पावसाचा जोर राहणार आहे. किनारपट्टीवर ताशी 35 ते 55 कि. मी. वेगाने वारे वाहत आहेत. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात उतरू नये, असा सतर्कतेचा संदेश हवामान खात्याने दिला आहे.
मोठ्या प्रमाणावर पीकहानी
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरूच असून मोठ्या प्रमाणावर पीकहानी झाली आहे. हावेरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनेक संपर्क रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पावसामुळे जिल्ह्यातील 1 हजार 835 हेक्टर भागातील कृषी पीकहानी आणि 40.25 हेक्टर बागायती पिकांची हानी झाली आहे.
दावणगेरे जिल्ह्यातही पावसाचा मारा सुरू असून अनेक ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. 50 हून अधिक घरांची पडझड झाली आहे. हातातोंडाशी आलेल्या भात पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कृषी आणि महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी नुकसानग्रत्त भागांना भेटी देऊन पाहणी केली आहे.
हंपी येथील स्मारके पाण्याखाली
विजयनगर जिल्ह्यातील तुंगभद्रा जलाशय परिसरातही सातत्याने कोसळत असलेल्या पावसामुळे जलाशयातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. मंगळवारी सुमारे 90 हजार क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. यामुळे हंपी येथील अनेक ऐतिहासिक स्मारके पाण्याखाली गेली आहे. कोप्पळ जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून संततधार सुरू असून कांदा, मका, तूर आणि कापूस पिकाची हानी झाली आहे.
बहिण-भावाचा तलावात बुडून मृत्यू
खेळताना केंगेरी येथील तलावात बुडून बहिण-भावाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी सायंकाळी घडली होती. त्या दोघांचे मृतदेह मंगळवारी सायंकाळी अग्नीशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. श्रीनिवास (वय 13) आणि महालक्ष्मी (वय 11) अशी बुडून मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. हर्षा लेआऊट येथील श्रीनिवास आणि महालक्ष्मी हे दोघे सोमवारी सायंकाळी 5:30 च्या सुमारास केंगेरी बसस्थानकासमोरील तलावाच्या फुटपाथ खेळत होते. यावेळी घागर घेऊन पाण्यात उतरलेल्या महालक्ष्मीचा तोल गेल्याने ती बुडाली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात श्रीनिवास देखील बुडाला. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या जवानांनी मृतदेहांचा शोध सुरू केला. रात्री उशिरापर्यंत मृतदेह हाती लागले नाहीत. सकाळी पुन्हा शोध सुरू करण्यात आल्यानंतर दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.